Mar 11, 2010

दत्तकविधान-4

दीड वर्षं!

तब्बल दीड वर्षं हातावर हात धरून भजन करायचं होतं. दुसरं मूल हवं होतं, त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती, पण मुलाचीच प्रतीक्षा होती. हा दीड वर्षांचा कालावधी फार जीवघेणा होता. आमच्या हातात काहीच नव्हतं...वाट बघण्याखेरीज!मनस्वी आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. शाळा, बाल भवनमधील दोस्त मंडळी, सोसायटीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरात धुडगूस सुरू झाल्यानं तिचीही स्वतःची मतं तयार होऊ लागली होती. "आपल्याकडेही बाळ आणायचं,' असं टुमणं सुरू झालं होतं. आम्ही तिला सांगूही शकत नव्हतो आणि लपवूही शकत नव्हतं. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार होता. सांगितलं असतं, तर बीबीसीवरून लगेच ही बातमी गावभर पोचली असती. वर "उद्याच बाळ आणायचं' म्हणून आम्हाला पळता भुई थोडी केली असती, ती गोष्ट वेगळी.वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही फॉलो अप घ्यायला सुरवात केली. तरीही बाळ ताब्यात मिळण्याचं काही चिन्ह नव्हतं. "सध्या एन्ट्री कमी झाल्या आहेत हो' एवढंच उत्तर ऐकायला मिळत होतं.ही अस्वस्थता आणि प्रतीक्षा भयानक होती. वेळ हातातून चाललाय आणि आपल्याला मूल कधी मिळणार, मिळणार की नाही, याविषयी काहीच कल्पना येत नव्हती. एवढा काळ थांबलो, ते चुकलं तर नाही ना, असाही विचार मनात डोकावू लागला होता. ते सर्वांत धोकादायक होतं.अखेर एके दिवशी पालकांच्या दत्तकपूर्व मार्गदर्शन शिबिराचं निमंत्रण आलं. मूल मिळणार असल्याची आधीची पायरी होती ती. बरेच दिवस नुसतेच प्रतीक्षा करत असलेल्या आम्हाला वाळवंटातली पावसाची सुखद झुळूकच वाटली ती.शिबिर दिवसभराचं होतं. माझा ट्रेकिंगमधला एक मित्रही तिथे भेटला. तो मुलानंतर मुलगी दत्तक घेणार होता. अन्यही अनेक जोडपी होती. कुणाला स्वतःचं मूल नव्हतं म्हणून, तर कुणी अन्य कारणांनी मूल दत्तक घेणार होते. दुसरं मूल दत्तक घेणारी जोडपी कमी होती. शिबिरात मुलांना वाढविण्याविषयी मानसोपचारतज्ज्ञांचं मार्गदर्शन, प्रत्यक्ष दत्तक गेलेल्यांचे अनुभव, असे काही कार्यक्रम झाले.मुख्य म्हणजे आपण दत्तक घेणार असलेलं मूल सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या नैसर्गिक मुलापेक्षा दिसायला, वागायला, स्वभावाला वेगळं असणार आहे, हे तिथे स्पष्ट झालं. त्याला आपलंसं करून घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत, हेही लक्षात आलं. दोन मुलांमध्ये योग्य समतोल ठेवणं, मुलाला आपल्या छोट्या भावंडाविषयी योग्य रीतीनं आणि योग्य वेळी समजावून सांगणं, हेही किती महत्त्वाचं आणि जोखमीचं काम आहे, हे लक्षात आलं.स्वीला आम्ही तोपर्यंत कल्पना दिली नव्हती. बाळ ताब्यात मिळण्याची तारीख नजरेच्या टप्प्यात आली की तिला हळुहळू सांगू, असा आमचा विचार होता. या शिबिरानंतर तिला आता कल्पना द्यायला हरकत नाही, असं वाटलं

(क्रमश:)

1 comment:

हेरंब said...

खुपच छान. पुढचा भागही लवकर टाका. तुम्ही म्हणालात तसं दीड वर्ष वेटिंग हे नक्कीच अनपेक्षित पण तेवढंच सुखद आहे. नक्कीच.