आमच्या तपश्चर्यापूर्तीचा दिवस!
सकाळी दहा वाजता निमिषला घरी आणण्यासाठी जायचं होतं. मनस्वी आज तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहणार होती. तिच्या प्रतिक्रियेविषयी प्रचंड उत्सुकता होती. एवढे दिवस तिच्यासाठी ती केवळ दंतकथा होती. शाळेत, शेजारीपाजारी चर्चा करून झाली होती. आता प्रत्यक्ष घरी आल्यानंतर ती त्याला कसं स्वीकारते, हे पाहण्याची आम्हाला उत्कंठा होती.आधी संस्थेच्या कार्यालयात गेलो. निमिषला पाहून मनस्वीची प्रतिक्रिया अतिशय नॉर्मल होती. अगदी कुठल्याही बाळाला पाहावं, अशीच. मी आलो, तोपर्यंत आमच्या स्वागताची आणि सत्काराची तयारी झाली होती.संस्थेत पाट, रांगोळी काढण्यात आली होती. तिथे आम्हाला बसवून आमचं औक्षण करण्यात आलं. निमिषला नवे कपडे घालून आमच्या ताब्यात देण्यात आलं. मनस्वी आणि निमिष, दोघांनाही हार घातले होते. दोघांनाही औक्षण केलं. मनस्वीला हळद-कुंकू लावलं. एवढा मान मिळाला आणि कौतुक झालं, त्यामुळं ती हवेतच होती. त्याला पाहायची, हाताळायची, जाणून घ्यायची तिला भयंकर उत्सुकता लागली होती. त्यामुळं कधी एकदा तो सत्कार उरकून त्याला घरी घेऊन जातेय, असं तिला झालं होतं.वीस वर्षांपूर्वी स्वीडनला दत्तक गेलेली एक मुलगीही तिथे आली होती. तिचं लग्न ठरलं होतं आणि आपल्या आईवडिलांसह ती या संस्थेचे ऋण व्यक्त करायला भावी पतीसह आली होती. तिनंही निमिषला ओवाळलं.या वेळेला मी आठवणीनं गाडीची किल्ली माझ्याजवळच ठेवली होती. गाडीतून घरी येताना निमिषची प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी मनस्वीचा आटापिटा चालू होता. तो गोट्या छान हसत होता. कुणाच्या हातून कुणाच्या हाती जाऊन पडलोय, वगैरे प्रश्नांची चिंता त्याला पडलेली दिसत नव्हती. मनस्वीचे हात पकडत होता, तिचे केस ओढायचा प्रयत्न करत होता. त्याच्या या बाललीलांनी मनस्वी चेकाळली होती. एखादं एवढं हक्काचं बाळ तिला पहिल्यांदाच जवळून पाहायला, खेळायला मिळालं होतं. त्याचा आनंद तिच्या नसानसांतून दौडत होता.घरी आल्यावरही नवं घर, नवी माणसं पाहून निमिष रडला नाही की धिंगाणा घातला नाही. अधूनमधून "हूं' करत होता, तेवढंच. पण "चूं' मात्र केलं नाही त्यानं!निमिषच्या स्वागतासाठी आणि संगोपनासाठी हर्षदानं ऑफिसातून तीन महिन्यांची दणदणीत रजा काढली होती आणि मी एक दिवसाची!
No comments:
Post a Comment