हर्षदा आणि मी एकत्र भेटून (एकमेकांशी) लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दुसऱ्याच बैठकीत आपल्या (भावी) अपत्यांविषयी चर्चा केली होती. सुदैवानं तिची आणि माझी आवड त्या बाबतीतही जुळली...एकट्या मुलांचे प्रश्न आसपासच्या कुटुंबांत पाहायला मिळत होते. मुलं एकांडी, हेकेखोर होणं, एकाच प्रकारे विचार करण्याची किंवा दुसऱ्यामध्ये न मिसळण्याची प्रवृत्ती निर्माण होणंही नवीन नव्हतं. आपल्याला दोन मुलं असायला हवीत, त्यातही एक मुलगा-एक मुलगी असावी, हे त्यामुळेच मनात पक्कं केलं होतं.स्वतःच्याच रक्तामांसाच्या मुलाचा अट्टहास धरण्यापेक्षा जगात आधीच जन्माला आलेल्या, पण चांगल्या आधाराअभावी हलाखीचं जीवन वाट्याला येणाऱ्या एखाद्या जीवाला मायेची पाखर का घालू नये, असा विचार मनात यायचा. वैवाहिक आयुष्याविषयी अधिकाधिक सजग होऊ लागलो, तेव्हा आपणही असाच प्रयोग करायचा, हे मनात पक्कं होत गेलं. सामाजिक कामाचा थोडासा वाटाही त्यात होताच.सुदैवानं हर्षदाही त्याच विचारांची होती....त्यातूनच आम्ही तो निर्णय घेतला.मूल दत्तक घेण्याचा!पहिलं मूल स्वतःचं जन्माला घालायचं (झालं तर!) आणि दुसरं दत्तक घ्यायचं, असं ठरवून टाकलं. लग्नाआधीच! (म्हणजे, लग्नाआधी ठरवलं आणि लग्नानंतर जन्माला घातलं. नसत्या शंका घेऊ नका!) पहिला मुलगा झाला तर मुलगी आणि मुलगी झाली तर मुलगा, हे निश्चित झालं.मनस्वीने आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि तिच्यात छान रमून गेलो. आयुष्याला एक वेगळी दिशा, जगण्याची नवी आशा मिळाली. दोन मुलांमध्ये साधारण तीन वर्षांचं अंतर असावं, असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे ती तीन वर्षांची होईपर्यंत आम्ही निर्धास्त होतो. लग्न ठरवितानाही, बाजारात "आपण उतरलो की सहा महिन्यांत लग्न' असा एक भाबडा माज होता, तो काही महिन्यांतच उतरला होता. दत्तक मुलाच्या बाबतीतही तसंच झालं.मनस्वीचा तिसरा वाढदिवस साजरा झाल्यानंतर आम्ही हालचाल करायला सुरवात केली. आम्ही संस्थेत जाऊन दत्तक मुलासाठी अर्ज दिला, की झालंच आमचं काम, अशी आमची समजूत होती. दत्तक मूल घेतलेल्या काही पालकांकडून वरवर माहिती मिळाली होती, पण त्याची प्रक्रिया आणि कालावधी, याविषयी काहीच कल्पना नव्हती....
(क्रमश:)
(दत्तक विधान-1)
No comments:
Post a Comment