Jun 12, 2010

सौजन्याची ऐशीतैशी

""तीन पासपोर्ट साइझ फोटो आणावे लागतील!''
महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेतील त्या बाई शक्‍य तेवढा नम्रपणा टाळून मला सांगत होत्या.
पीपीएफच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मी बॅंकेत गेलो होतो. पैसे काढण्यासाठी फोटो कशाला, याचाच उलगडा प्रथम होईना. पण "बाबा वाक्‍यम प्रमाणम्‌' मानून मी दुसऱ्या दिवशी तीन फोटो घेऊन त्यांच्याकडे गेलो. पीपीएफ खात्याचे नूतनीकरण करून नवे पासबुक दिले जाणार होते. जुन्या खातेदारांनी त्यासाठी आणि बॅंकेच्या रेकॉर्डसाठी फोटो देणे आवश्‍यक होते. पण त्याचा खुलासा न करता "तीन फोटो आणून द्या!' असा तुच्छ आदेश माझ्या तोंडावर मारण्यात आला होता. त्या काळात बॅंकेत पीपीएफच्या व्यवहारासाठी गेलेल्या कोणत्याही ग्राहकाचे असेच स्वागत करण्यात येत होते. "पीपीएफ खातेदार वर्षातून एखाद-दोन वेळाच उगवतात. मग त्यांना सांगायचे कधी' असा युक्तिवाद बॅंक अधिकारी करू शकले असते. त्यामुळे अधिक चर्चा करण्याचे मी चतुराईने टाळले होते.
यंदा वेगळाच अनुभव आला. गेल्या मंगळवारीच पुन्हा बॅंकेत पीपीएफमधून पैसे काढण्याच्या चौकशीसाठी गेलो होतो. "त्या बाईंना भेटा' असा आदेश मिळाल्यानंतर तिकडे गेलो. त्यांनी किती रक्कम काढता येईल हे सांगितलं आणि पुन्हा स्लिप भरून दिल्यावर माझ्या लक्षात आलं, रेव्हेन्यू स्टॅंपही लागतो पैसे काढायला. तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्यावर शिक्कामोर्तब झालं. पुन्हा रेव्हेन्यू स्टॅंप शोधाच्या मोहिमेवर निघायला हवं होतं. रेव्हेन्यू स्टॅंपही हल्ली कोर्ट किंवा सिटी पोस्ट ऑफिसाशिवाय कुठेही मिळत नसल्यानं ती मोहीमही अवघडच होती. पण लगेच एवढी धावपळ करण्याऐवजी दुसऱ्या दिवशीच स्टॅंप घेऊन पुन्हा येण्याचं मी ठरवलं.
दुसऱ्या दिवशी गेलो, पुन्हा स्लिप सादर केली, पुन्हा त्या बाईंना भेटण्याचा आदेश मिळाला. बाई कामात होत्या. "जुनं पासबुक आणलंय का?' त्यांनी अगत्यानं विचारलं.
नवीन पासबुक या बॅंकेकडूनच घेतल्यानंतर मुळात मी जुनं पासबुक संग्रही सुद्धा ठेवण्याचा संबंध नव्हता. पण चिठ्ठ्याचपाट्या जपून ठेवण्याची खाज म्हणून हे पासबुक ठेवलं होतं. आत्ता सोबत मात्र आणलं नव्हतं.
""जुनं पासबुक कशाला?'' मी भोळेपणानं विचारलं.
त्यावरचा खात्याचा जुना नंबर त्यांना हवा होता, असं कळलं. ज्या बॅंकेनं त्यांच्याच खात्याचे नवे नंबर खातेदारांना दिले, नवी पासबुकं दिली, त्यांच्याकडे तेच नंबर रेकॉर्डवर नव्हते. माझं डोकं सटकू लागलं होतं, पण गरज मलाच असल्यानं स्वतःला सावरलं.
"तुमच्याकडच्याच खात्याचा नंबर तुमच्याकडे का नाही,' असं त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर त्याचा ढिम्म परिणाम झाला.
मग मी घरी फोन करून मनस्वी, बाळाला सांभाळणाऱ्या आमच्या मावशी आणि शेजारच्या छोट्या मुलीला कामाला लावून माझ्या ड्रॉवरमधून आधी पासबुक आणि नंतर त्याचा नंबर त्यांना शोधायला लावला. मग तो त्या बाईंना दिला. त्यातून त्यांनी कपाटातून बरंच जुनं बाड काढून माझ्या खात्याची माहिती ताडून पाहिली. त्यांची खात्री पटल्यावर माझा अर्ज दाखल करून घेतला.
आता लगेच मला पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. पण पुढच्याच प्रश्‍नानं पुन्हा धास्तावायला झालं.
"इथे सेव्हिंग अकाऊंट आहे ता तुमचं?' त्यांनी विचारलं.
नाही म्हटल्यावर बहुधा एक दिवस ड्राफ्टसाठी जाणार, अशी खूणगाठ मी बांधली. पण माझा अंदाज चुकला होता.
""दोन दिवस लागतील. सोमवारी या!'' बाईंनी शांतपणे सांगितलं.
""सोमवारी?'' मी ओरडलोच!
मी बॅंकेत मंगळवारी गेलो होतो. दोन दिवस धरले, तरी गुरुवारी ड्राफ्ट मिळायला हवा होता. सरकारी वेळापत्रकानुसार आणखी एक दिवस जादाचा धरला, तरी गेला बाजार शुक्रवारी माझं काम व्हायला काही हरकत नव्हती.
""अहो सोमवारपर्यंत दोन दिवस होत नाहीत!'' मी धाडस करून बाईंना म्हणालो.
""हे बघा, आम्ही दहा तारखेच्या आत कुणालाच पैसे देत नाही. आणि सध्या टॅक्‍सची कामं चालू आहेत.'' बाईंच्या आविर्भावात काही बदल नव्हता.
मी फार वाद घालत बसलो नाही. मलाही पैशांची फार घाई नव्हती. पुन्हा येणं शक्‍य नाही, अशातलाही भाग नव्हता. त्यामुळं मी पुढच्या कामांकडे वळायचं ठरवलं.
लोखंडी दरवाजाला लावलेल्या दोरखंडांच्या साखळीच्या खालून वाकून बॅंकेतून बाहेर पडलो. मनाला लावलेले पारंपरिकतेचे दोरखंड ही मंडळी कधी दूर करणार, हाच विचार त्या वेळी मनात आला...
 

2 comments:

Unknown said...

ही तर सर्व सामान्यांची खंत आहे, बॅंकेत सामान्यांना नेहमीच ताटकळत ठेवतात, कदाचित PSU बॅंकेत Private पेक्षा जास्त काम असेल म्हणुन असे होऊ शकेल, पण हे काही कारण होऊ शकत नाही कारण जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीतुन आले असाल तर तुम्हाला special treatment मिळते, भारतात अजुन Customer is king ही प्रवृत्ती अजुन रुळलेली नाही.

अनिकेत वैद्य said...

अभिजीत,
बॅंक कर्मचार्यांबद्दल अन त्यांचा कार्यपद्धतीबद्दल बोलावे तेव्हडे थोडेच आहे. आपली गत मात्र ’आडला हरी अन ...’ अशीच असते. स्व:तचे पैसे मिळवण्यासाठी सुद्धा अक्षरश: भिक मागितल्यासारखे वागावे लागते.
बचत खात्यात पैसे भरणे, ड्राफ्ट काढणे अश्या साध्या साध्या कामांसाठी सुद्ध्या एव्हडा वेळ लागतो अन मनस्ताप होतो की सगळ सोडून घरी पैसे ठेवावेत असच वाटतं.

रेव्हेनू स्टॅंप संबंधी : काही ठिकाणी पोस्ट एजन्सी आहेत. अश्या ठिकाणी रेव्हेनू स्टॅंप लगेच मिळतात.
सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल समोरच्या गल्लीत, शिवपुष्प पार्कच्या अलिकडे डाव्या हाताला रुची पोस्ट सेवा केंद्र आहे. तिकडे रेव्हेनू स्टॅंप मिळतात. दुकान असल्याने रात्री ८:३०-९ पर्यंत मिळतात. शक्य झाल्यास एकदाच ५-७ घेउन ठेवा. वेळॆला उपयोगी पडतात.
(मी हेच करतो.)