Jul 17, 2017

शेजारधर्म!

``नमस्कार. आत येऊ का?`` दारात उभ्या असलेल्या त्या अनोळखी गृहस्थांनी नम्रपणे विचारणा केली आणि शंतनुनं अदबीनं त्यांना नमस्कार करून दार उघडलं.
``अहो या ना, प्लीज!`` त्यानं दारात उभ्या असलेल्या त्या दांपत्याचं स्वागत केलं, पण हे नक्की कोण आहेत, हा उलगडा काही त्याला झाला नव्हता.
``सॉरी, आपली ओळख नाही आणि आम्ही असे अचानक तुम्हाला न कळवता आलो. डिस्टर्ब तर नाही ना केलं? `` त्यांनी पुन्हा नम्रपणा दाखवला.
``नाही हो. इट्स ओके. बसा ना.`` शंतनुने त्यांना खुर्ची दिली. दोघेही जरा स्थिरावले.
``आम्ही शारंगधर. इथेच, ह्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहतो.`` त्या दांपत्यानं खुलासा केला, तेव्हा शंतनुच्या मनातलं प्रश्नचिन्हही दूर झालं.
``अरे, हो का? सॉरी, मी ओळखलं नाही. आम्हीसुद्धा इथे नवीनच आहोत ना, जेमतेम एक महिनाच झालाय आम्हाला इथे येऊन.``
``हो, कळलं आम्हाला अध्यक्षांकडून. म्हणूनच तुमच्याकडे आलोय. आम्हालाही फ्लॅट विकायचाय. त्यासाठी तुमची मदत हवी होती.``
``अवश्य. बोला ना. शेजाऱ्यांना मदत करणं, हे कर्तव्यच आहे आपलं.``
``आम्हाला सोसायटीचा सॅंक्शन्ड प्लॅन पाहिजे होता. तो कुठेच मिळत नाहीये.``
``काय सांगता? सोसायटीकडे पण नाहीये? ``
``नाही. सगळीकडे प्रयत्न केले, कुठेच मिळेना, म्हणून शेवटी तुमच्याकडे आलो. तुमचा नुकताच व्यवहार झालाय, तुमच्याकडे तो नक्की असेल असं वाटलं. ``
``बरं झालं, तुम्ही आमच्याकडे आलात. अहो, आमच्या फ्लॅटच्या व्यवहाराच्या वेळेलाही असाच त्रास झाला होता आम्हाला. घर घेणं म्हणजे बाळंतपण पार पाडण्यासारखंच असतं. सगळा त्रास सहन करावा लागतो!`` बायकोनं आणून दिलेला चहा त्या दोघांना देत शंतनू म्हणाला. त्या दोघांनीही नको नको करत चहा घेतला.
``आम्हाला तर कुणीच मदत केली नव्हती. सगळयांनी अडवणूक केली. एका क्षणी तर आता काही घर होत नाही, असंच वाटून गेलं होतं. अगदी पार माणुसकी विसरून जातात लोक अशा व्यवहारात.`` शंतनूनं त्याची व्यथा सांगितली.
``हो ना.`` शारंगधरांनीही दुजोरा दिला.
``हा मॅप शोधण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडलं. महापालिकेत खेटे घातले, तिथल्या शिपायाला पैसे देऊन बघितलं, नगरसेवकाचा वशिला लावला, तरीही ढिम्म. शेवटी वैतागून गेलो. मग बॅंकेच्या वकिलानंच पाच हजार रुपये घेऊन करून दिलं आमचं काम. बहुतेक पैशांसाठीच अडवलं होतं!`` शंतनूचा सगळा संताप त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
``हे वकील इथून तिथून सारखेच. ग्राहकांना लुबाडण्यातच जन्म जाणार ह्यांचा!`` शारंगधरांनी त्यांचाही अनुभव सांगितला.
``खरंतर आमच्या आधीच्या मालकांनीच हा प्लॅन आम्हाला द्यायला हवा होता. पण काय करणार, गरज आमची होती ना, आमचे हात दगडाखाली होते. बॅंकेचें कर्ज नामंजूर झालं असतं, म्हणून आम्हीच सोसला तो भुर्दंड. अक्कलखाती गेले म्हणायचं, आणि गप्प बसायचं!`` शंतनूनं त्यांच मन मोकळं केलं.
``हो, हे खरंय. पण तुमच्यासारखी माणसं भेटली, की जगात माणुसकी शिल्लक असल्याची खातरी पटते.`` शारंगधर चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले. एव्हाना शंतनूने तो प्लॅन शोधून त्यांच्यासमोर उलगडला होता. त्यात त्यांचा फ्लॅट स्पष्ट दिसत होता. त्यांचं काम झालं होतं. हा प्लॅन त्यांना चालणार होता. त्यांचा चेहरा एकदम खुलला.
``हेच तर हवं होतं मला. कॉपी काढून घेण्यापुरता मला हा द्याल का?``
``अरे, म्हणजे काय! अर्थातच. काही प्रॉब्लेम नाही. घेऊन जा तुम्ही. ``
``थॅक्यू. थॅंक्यू शंतनू साहेब.``
``अहो थॅंक्यू काय? शेजारी आहात तुम्ही आमचे. एवढं तर करायला हवंच ना माणुसकी म्हणून! `` शंतनूने हसून उत्तर दिलं आणि शारंगधर आणखी कृतकृत्य झाले. असे शेजारी आणखी काही काळ लाभायला पाहिजे होते, आपण उगाच फ्लॅटचा व्यवहार लवकर करतोय, असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. ते दारातून बाहेर पाऊल टाकणार, तेवढ्यात शंतनूचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर आले, ``आम्हाला प्लॅनसाठी पाच हजार रुपये पडले होते, म्हणून तेवढेच तुमच्याकडून घेतोय. झेरॉक्स काढून आणल्यावर दिलेत तरी चालतील. काही घाई नाही. माणुसकी सोडलेली नाही आम्ही वकिलांसारखी!``

No comments: