``तुला तर माहितीच आहे ना, मी कसा माणूस आहे ते? माझ्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय तिनं! विश्वासघाताचा आरोप! मी तिला फसवू शकतो का? तिलाच काय, मी कुणालातरी फसवू शकतो का? असा लबाड माणूस वाटतो का मी?`` तो अगदीच सैरभैर झाला होता. खचून गेला होता. त्याला एवढं निराश झालेलं कधीच कुणी बघितलं नव्हतं. तो आत्तापर्यंत कायम स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगत आला होता. कधी कुठल्याही गोष्टीसाठी कुणावर अवलंबून राहिला नव्हता. आज मात्र त्याची उमेद पार खचली होती. आता तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही, असंच कुणालाही त्याच्याकडे बघून वाटलं असतं.
``एवढी वर्षं एकत्र राहिलो आम्ही आणि आता ती माझ्यावर असे आरोप करतेय. मी तिला फसवलं, असं सांगून आजच घटस्फोटासाठी अर्ज केलाय तिनं. मी काय करू? तिच्यावरचं प्रेम पुन्हा सिद्ध करून दाखवू का? `` तो पुन्हा रडायला लागला.
``एवढं प्रेम होतं आमचं एकमेकांवर, तरीही तिनं माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला! मी इमोशनल बोलून कायम सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणाली ती. इमोशन्स वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो? मी? तुला तरी पटतं का हे? तुझ्या बाबतीत तरी कधी केलंय का मी असं?`` त्यानं पुन्हा डोळ्यांत पाणी आणून तिला विचारलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो पुन्हा हमसाहमशी रडायला लागला.
``राजा, तू रडू नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच अशी दुसऱ्याची भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीस रे, माझ्या सोन्या!`` ती त्याच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाली. तिनं त्याला आधार देण्यासाठी मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूधारा ओघळायला लागल्या...
No comments:
Post a Comment