Jul 17, 2017

ता. क.

``माझ्यासाठी हा निकाल अतिशय दुःखदायक होता. अशी कामं करायला कधीकधी जिवावर येतं, पण काय करणार, हा आमचा व्यवसाय आहे. असो. तुमच्या दोघांच्याही भावी आयुष्याला शुभेच्छा. आनंदी राहा.`` खूप जड अंतःकरणाने वकील साहेबांनी प्रणव आणि अवनीला शुभेच्छा दिल्या.
प्रणव आणि अवनीलाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांच्या आयुष्यातला हा कदाचित सर्वांत कटू दिवस होता. दोघांनी गेली दोन वर्षं एकमेकांशी खूप चर्चा केली, खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आपापसातले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. नाइलाजानं तो निर्णय घ्यावा लागला होता...एकमेकांपासून वेगळं होण्याचा.
खरंतर त्या दोघांचा प्रेमविवाह. एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झालेली. ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून लग्न, असा रीतसर प्रवास पाच वर्षांचा होता. प्रेम आंधळं का कसंतरी असतं असं म्हणतात, ते प्रणवला लग्नानंतर जाणवायला लागलं. किरकोळ कारणावरून त्याचे अवनीशी खटके उडायला लागले. अवनीचा अतिव्यवस्थितपणा आणि नियमानुसार वागण्याचा अतिआग्रह हेच आधी त्यांच्यातल्या प्रेमाचं आणि नंतर विसंवादाचं कारण ठरलं होतं. अवनी मराठीची प्राध्यापक. अतिशय बुद्धिमान. तर प्रणव जगण्याकडे हसतखेळत बघणारा, छोट्या चुका नजरेआड करणारा, स्वच्छंदी. हे दक्षिण आणि उत्तर ध्रुव काही एकत्र येऊ शकले नाहीत. आपलं एकमेकांवर प्रेम असलं, तरी आपण एकत्र संसार करू शकत नाही, या निर्णयावर ते आले आणि सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. पुढील कायदेशीर अडथळेही सुरळीत पार पडले.
घटस्फोट मंजूर झाल्याच्या दिवशी ते पुन्हा भेटले, तेव्हा नाही म्हटलं तरी दोघांच्याही काळजात काहीतरी हललंच. प्रणवनं तिला एक पत्र दिलं. ओळख झाल्यापासून अशी अनेक पत्रं त्यानं तिला लिहिली होती. आजचं हे कदाचित शेवटचं होतं. त्यानं लिहिलं होतं, ``अवनी, तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी व्यक्ती ज्याच्या आयुष्यात असेल, तो खरंच भाग्यवान. काही काळासाठी मला हे भाग्य लाभलं, पण मी दुर्दैवी ठरलो. आयुष्यभरासाठी तुझी सोबत मिळू शकली नाही. पुढच्या काळात तुझी साथ नसली, तरी तुझ्याबरोबर घालवलेल्या काही चांगल्या क्षणांची आठवण काढून मी तो काळ निभावून नेईन.
कायम हसत राहा, सुखी राहा.
ता. क. :
आणि हो, आणखी कुणावर माझ्यासारखंच अमाप प्रेम केलंस, तर माझ्याप्रमाणे त्याच्या व्याकरणाच्या चुका काढत जाऊ नकोस. बाय!``
घरी आल्यावर प्रणवचं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचताना अवनीचे डोळे भरून आले. आता बरंच काही घडून गेलं होतं, पण हा कटू निर्णय बदलता आला असता का, असा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. तिनंही हातातली कामं बाजूला ठेवून प्रणवला एक भावनिक पत्र लिहिलं. आजपर्यंतचं कदाचित मायेचा सर्वाधिक ओलावा असलेलं ते पत्र होतं. सगळं पत्र पूर्ण झाल्यावर तिनं लिहिलं,
`ता. क. `व्याकरणा`च्या नाही रे, `शुद्धलेखना`च्या!`

No comments: