Jul 17, 2017

नशीब


``काय काय नशीबाचे भोग आले नाही, आपल्या वाट्याला? आजचा दिवस कधी बघू शकेन, असं वाटलंच नव्हतं मला.`` ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली.
``खरंच. माझ्या मनातलं बोललीस. मी तुला मधल्या काळात धीर देत होतो, पण मनातून पार खचून गेलो होतो. आपण कधी एकत्र येऊ, ही आशाच सोडून दिली होती.`` त्यानं हळूच डोळे पुसले.
``नशीब आपल्याला कुठेकुठे घेऊन जातं, नाही? तुला सांगू, नशीब वगैरे गोष्टींवर आधी माझा कधीच विश्वास नव्हता. `माझी वेळ चुकली,` `नशीबात असेल ते मिळतंच`, वगैरे गोष्टींची टर उडवायचे मी एकेकाळी. पण तुझ्याशी भेट झाली आणि मी हळूहळू बदलत गेले.``
``केवढी कचाकचा भांडली होतीस, पहिल्याच दिवशी माझ्याशी, आठवतंय? ह्या मुलीचं पुन्हा आयुष्यात कधी तोंड बघायचं नाही, असं ठरवलं होतं मी!``
``हो, मीसुद्धा!`` ती हसून म्हणाली.
``चोराच्या उलट्या बोंबा!``
``का? तुझी काहीच चूक नव्हती त्या दिवशी?``
``अजिबात नव्हती! रांगेत मीच पुढे होतो. तू उशिरा आली होतीस!``
``आता पुन्हा त्यावरून भांडणारेस का आज माझ्याशी? चार वर्षं झाली त्या गोष्टीला. त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय साहेब!``
``हो, आपण पुन्हा भेटलो तेव्हा पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातच अडकलो होतो. तेव्हासुद्धा मला बघून तोंड फिरवलं होतंस तू. पण दुसरा काही पर्यायच नव्हता, म्हणून माझी छत्री, माझा रुमाल, माझी गाडी, सगळंच घेतलंस.``
``आणि तुझं मनसुद्धा, ना?``
``शी! खूपच पांचट होता हा!``
``असू दे. तुझ्याकडूनच शिकलेय!``
``विषय बदलू नकोस. बरं, नेलंस ते नेलंस, दुसऱ्या दिवशी वेळेवर आणूनसुद्धा दिलं नाहीस!`` त्यानं पुन्हा तिची खोडी काढली.
``हो क्का? बरं! मग आत्तासुद्धा तुझीच गाडी घेऊन मी घरी जाते. तू ये चालत.`` ती फणकाऱ्यानं उठली.
``अगं अगं! रागावतेस काय नुकतंच प्रेमात पडल्यासारखी? साडेतीन वर्षं झाली आपण प्रेमात पडून. आज आपलं लग्नसुद्धा झालंय. इथे मस्त समुद्रावर आलोय, जरा बसूया निवांत. गप्पा मारू. घरी जाऊन पुन्हा भांडायचंच आहे! `` त्याच्या या वाक्यावर तिला हसायचं नव्हतं, पण तिला ते आवरता आलं नाही.
``स्वीट रास्कल आहेस तू. कितीही टोकाचं भांडण झालं, तरी दोन मिनिटांत नॉर्मलला येतोस आणि माझी समजूत काढतोस. तुझ्या याच स्वभावावर फिदा झालेय मी.``
``आणि मी तुझ्या वस्सकन अंगावर येण्यावर!`` त्यानं पुन्हा तिला चिमटा काढला.
``आपल्या भांडणाचं काही टेन्शन नाही रे, पण आपल्या घरच्यांची भांडणं कधीच मिटणार नाहीत, याची काळजी वाटतेय मला. माझ्या नशीबात सासरचे आणि माहेरचे दोन्ही नातेवाईक नसणारेत, यापुढे कधीच.``
``थोड्या दिवसांनी होईल सगळं सुरळीत. काळजी नको करू.``
``नाही होणार. मी दोन्ही घरच्यांना ओळखते. त्यांच्या मनातला आपल्याबद्दलचा आणि एकमेकांबद्दलचा राग बघितलाय मी. आणि खोट्या आशेवर जगायला मला नाही आवडत.``
``हं. खरंच आहे. आपल्या नशीबात ते नव्हतं, असं म्हणू आणि आपलं आयुष्य जगायला लागू.``
``करेक्ट बोललास. आणि मला कसलीही खंत नाहीये. घरच्यांचे आशीर्वाद मिळाले नसतील, पण रीतसर रजिस्टर लग्न झालंय आपलं. आता आयुष्यभर तू माझ्याबरोबर आहेस ना, मग बास! तुझी साथ असेल, तर नशीब साथ देईलच!``
ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यालाही भरून आलं.
...
संध्याकाळी समुद्राजवळच्या रस्त्यावर भरपूर गर्दी जमली होती. नुकताच एक भीषण अपघात तिथे झाला होता. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. अपघात झालेली बससुद्धा एका इलेक्ट्रिक पोलवर धडकलेल्या अवस्थेत तिथेच उभी होती. तिच्या चाकापाशी रक्ताचं थारोळं साचलेलं दिसत होतं.
कुणीतरी शेजारच्या माणसाला म्हणत होतं, ``दोघं जण गेले म्हणे. आजच लग्न झालं होतं त्यांचं. बिच्चारे! समुद्रावर फिरायला आले होते. घरी जात असताना एकदम बसचे ब्रेक फेल झाले आणि या दोघांना धडक बसली. दोघंही ऑन द स्पॉट खलास!``
शेजारी म्हणाला, ``वाईट झालं. काय तरी नशीब असतं नाही एकेकाचं?``

No comments: