Feb 17, 2009

शीर्षकाने केला घोटाळा

काही परीक्षणं लिहायला जाम मजा येते। काही अगदी रूटीन होतात. पण चित्रपटाची कथा-कल्पना आणि सादरीकरण यात काहीच संबंध नसेल, तर ती विसंगती लगेच पकडता येते. अशाच काही "जमलेल्या' परीक्षणांपैकी एक.
---
चित्रपटाच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मांडणं आणि परिणामकारक शीर्षकातून त्याला अपेक्षित परिणाम देणं हे खायचं काम नाही. `सालीनं केला घोटाळा'नं असा उत्तम परिणाम साधला आहे. `अल्ट्रा' कंपनी प्रस्तुत, भास्कर जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची कथा फिरते एका सालीभोवती. इथे `साली' ही शिवी किंवा मेहुणी या अर्थाने नाही, तर चक्क खरीखुरी केळ्याची साल आहे।
सटवाबाई (नयना आपटे) सारखी (गळ्यातील साखळीला अडकवून) केळी खात असते। तिच्या जाचाला कंटाळलेला जावई राजा गोंधळेकर (भरत जाधव) तिला मारण्याची सुपारी एका विमा एजंटाला (सिद्धार्थ जाधव) देतो। (आईशप्पथ! कुठे भेटतात असे विमा एजंट?) तिला मारताना तो तिनेच टाकलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरून पडतो। एकदा राजादेखील सासूनेच टाकलेल्या सालीवरून घसरून पडतो. आपल्या घरच्या अडचणी सोडविण्यासाठी राजा विसरभोळेंची (विजय चव्हाण) मदत घेतो. तेदेखील कधीकाळी सालीवरून (सटवाबाईने टाकलेल्या नव्हे!) घसरून पडलेले असतात.

चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला समजलेली कथा अशी. प्रत्यक्षात ही कथा संशयी पत्नी आणि धांदरट पती यांच्यातील गैरसमज आणि त्यातून होणाऱ्या गोंधळाची आहे, असं चित्रपटाचं माहितीपत्रक वाचून समजतं. या कथेचा (`शिवी'तल्या, मेहुणीतल्या किंवा केळ्याच्या) सालीशी काहीही संबंध नाही! असलाच; तर तो निव्वळ योगायोग समजावा!

सुरुवातीच्या मोलकरणीच्या दृश्‍यांपासून चित्रपट जी पकड घेतो, ती शेवटपर्यंत सोडत नाही। ही पकड मनाची की मानगुटीची, हे ज्याचं त्यानं ठरवावं। नंतर जी एकेक चित्तचक्षुवेधक आणि हास्यस्फोटक दृश्‍यं समोर येतात, त्यानं जागच्या जागी थिजून जायला होतं.चित्रपटाचं वैशिष्ट्य असं, की सालीनं केलेला घोटाळा तो हाच, असं दर अर्ध्या तासानं वाटतं. प्रत्यक्षात या घोटाळ्याचं गूढ शेवटीच उलगडतं आणि आधीचे घोटाळे कशाला दाखविले असावेत बुवा, असा प्रश्‍न पडतो.भरत जाधव, नयना आपटे, किशोरी अंबिये, विजय गोखले, शिल्पा, ऋतुजा आपटे यांनी चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसा अभिनय केला आहे. सिद्धार्थ जाधवनं उगीचच वेगळेपण वगैरे जपलं आहे.

Feb 16, 2009

भेट तुझी-माझी स्मरते...

वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्‍या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील.

मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे। कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्‍स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. काका-पुतण्याची केवळ तब्येतीच्या चौकशीसाठी झालेली ती भेट होती. मुलायमसिंह-अमरसिंह जोडगोळीनं ज्या निरपेक्ष देशभावनेतून कॉंग्रेस सरकारला पाठिंबा दिला, तेवढीच ही भेटही पवित्र होती. तिथेही मीडियानं राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला. अशोक चव्हाण यांनी नारायण राणेंची भेट घेतली, तीदेखील त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून महाराष्ट्रापुढील काही महत्त्वाच्या समस्यांविषयी मार्गदर्शन मिळविण्यासाठी होती.
प्रत्येक गोष्टीत "गॉसिप' शोधणाऱ्या मीडियानं अलीकडेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे आजी उपमुख्यमंत्री व भावी संभाव्य मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सदिच्छा भेटीचंही भांडवल करण्याचा प्रयत्न केला। या भेटीत काय घडलं, याच्या केवळ अंदाजपंची बातम्या सगळीकडे आल्या. त्याचं खरंखुरं वृत्त कुठेच आलं नाही. ते इथे देण्याचा प्रयत्न ः छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर हे सर्वजण सपत्नीक "मातोश्री' निवासस्थानी पोचले, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांची वाटच पाहत होते. रश्‍मीताईंनी सर्व वहिनींचे स्वागत केले. त्यानंतर सगळे जण बाळासाहेबांना भेटायला आत केले. नमस्कार चमत्कार झाल्यावर सगळे जण स्थानापन्न झाले.बाळासाहेब ः बरेच दिवस लावलेत, भुजबळ!
भुजबळ ः हो ना! व्यापात जमलंच नाही यायला। तरी, मी पंकजकडून तुमच्या तब्येतीची माहिती घेत होतो वेळोवेळी. आता कशी आहे तुमची तब्येत?
बाळासाहेब ः मायमराठीचा झेंडा फडकत ठेवण्यासाठी मी व्रतच घेतलंय, भुजबळ साहेब! मी ढेपाळलो, तर कसं चालेल?
भुजबळ ः खरं आहे, साहेब। पण आता तुम्ही उद्धवच्या खांद्यावर सोपवलेय ना जबाबदारी?
उद्धव ः (मध्येच हस्तक्षेप करून) भुजबळ, राजकारणावर अजिबात चर्चा करायची नाही, असं बजावलंय बाळासाहेबांनी! आपली ही सदिच्छा भेट आहे।
भुजबळ ः अरे हो, हो, विसरलोच होतो! बाकी, औषधं वगैरे सुरू आहेत ना व्यवस्थित?
बाळासाहेब ः तर! तुम्ही पण माझ्यासाठी हा खजूर-बिजूर आणलाय म्हणे! ठेवा तो। तो खाऊन आणखी टुणटुणीत होतो आणि दोरीच्या उड्या मारायला सुरवात करतो उद्यापासून!
(सगळ्या दालनात हास्यकल्लोळ।)
बाळासाहेब ः तुमच्या नाशिकच्या फार्मवरची झाडं कशी आहेत आता?
भुजबळ ः उत्तम! काही औषधी वनस्पती पण लावल्या आहेत। तुम्हाला पाठवून देईन. काहीकाही कडू औषधांचे डोस आमच्या काही मित्रांनाही पाजायचे आहेत लवकरच!
उद्धव ः भुजबळ साहेब, मघाशी आपलं काय ठरलंय?
भुजबळ ः अहो, मी औषधांबद्दलच बोलतोय! पंकज भेटला होता ना तुम्हाला मध्यंतरी?
बाळासाहेब ः हो तर! लग्नाची पत्रिका द्यायला आला होता तो। आज सुनांशी प्रत्यक्ष भेट झाली. शर्ट छान आहे हं तुझा पंकज! देशी की विलायती?
(पंकज काहीच बोलत नाही।)
बाळासाहेब ः असू दे असू दे। बाकी, आम्हाला विलायतीच आवडतं बुवा! द्या टाळी
(भुजबळ टाळी देतात।)
बाळासाहेब ः अरे, विसरलोच! अंजीरवाडीच्या गणपती मंदिराची काय हकिगत? पूजाबिजा होते की नाही व्यवस्थित?
भुजबळ ः तर हो! सगळं व्यवस्थित चाललं आहे। त्याचीच कृपा आहे.
बाळासाहेब ः त्याची आणि भवानीमातेची कृपा आहे हे खरं। तुम्ही पुन्हा एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचलात की त्यामुळेच!
भुजबळ ः हो ना! आता आपण एकत्र आलो तर...
(उद्धव पुन्हा भुजबळांना मघाचीच आठवण करून देतात।)
भुजबळ ः अरे हो रे! राजकारणाचा विषय काढायचा नाही, हे आहे माझ्या लक्षात! मी फोटोसाठी एकत्र येऊया म्हणतोय। बाळासाहेबांना फुलं देतानाचा फोटो काढायचा आहे.
उद्धव ः अच्छा, अच्छा! चला, भोजन करून घेऊया।
(सगळे जण भोजनाकडे वळतात। भोजनाच्या वेळीही हास्यविनोद आणि हवा-पाणी, तब्येत, इस्राईल-पॅलेस्टाईन युद्ध, भुजबळांच्या चष्म्याची बदललेली फ्रेम, बराक ओबामांचा शपधविधी, उद्धव ठाकरेंची नवी भटकंती, आदी विषयांवर चर्चा होतात.)
भोजन संपल्यावर भुजबळ आणि कुटुंबीय घरी जायला निघतात। इतर मंडळी पुढे गेल्यावर भुजबळ अचानक मागे फिरून पुन्हा बाळासाहेबांच्या जवळ येतात.
बाळासाहेब ः काही बोलायचं राहिलंय, का भुजबळ?
बाळासाहेब ः काही बोलायचं राहिलंय, का भुजबळ?
बाळासाहेब ः 18 वर्षांत आपली भेट नसली, तरी मी तुम्हाला ओळखतो भुजबळ! निःसंकोचपणे बोला!
भुजबळ ः या वेळच्या निवडणुकीत...
उद्धव ः भुजबळ साहेब...
उद्धव ः भुजबळ साहेब...
उद्धव ः तरीही, निवडणुकीचा विषय नको।
भुजबळ ः हो। मी वेगळंच सांगतोय. या निवडणुकीतही मोठं आव्हान आहे. आमच्या सरकारची कामगिरी, युतीचा जोर, सगळंच पणाला लागणार आहे. आमचीही दमछाक खूप होणार आहे. तेव्हा...
बाळासाहेब ः तेव्हा काय?
भुजबळ ः तुमच्याकडे आज "खिमा पॅटीस' ज्यानं बनवलं, तो आचारी द्याल आमच्या दिमतीला? मग प्रचाराचं काही टेन्शन राहणार नाही!
(सगळे जण पुन्हा हास्यकल्लोळात बुडून जातात.)

Feb 5, 2009

`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त!

कित्ती हुशार आहे हो तुमची मुलगी! किती छान नाचते, हावभाव करते, समज तरी किती आहे तिला वयापेक्षा!!
या आणि असल्या प्रशंसेने आम्ही (आणखीनच) फुगलो होतो. त्यातून भर पडली, सारेगमप सुरू झाल्यानंतर तिच्या आणि मुग्धा वैशंपायनच्या तुलनेची. "सेम टू सेम मुग्धा हं!' अशा कॉंप्लिमेंट्‌स मनस्वीला घडोघडी, जागोजागी मिळू लागल्या. "अगं मुग्धा, मला ओळखलंस का?' असं थेट विचारणाऱ्या अनोळखी बायकाही ठिकठिकाणी भेटू लागल्या. जणू या बया गेल्या जन्मी मुग्धाच्या आयाच होत्या आणि आता नव्या जन्मात मुग्धानं मनस्वीचं रूप घेतल्यानंतर त्या तिला जुनी ओळख दाखवू पाहत होत्या!
मनस्वीच्या अंगातही मग "मुग्धा' संचारायला वेळ लागला नाही. आधी "एकापेक्षा एक' चालू असताना ती भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर होती. आता मुग्धा, आर्या, कार्तिकी झाली. मग शाळेतून घरी आल्यानंतर तोंडापुढे मुठीचा माईक धरून ती घराचा "सारेगमप'चा मंच करून टाकायची! मला आणि बायकोला आलटून पालटून अवधूतदादा आणि वैशालीताईच्या भूमिका बजावायला लागायच्या.
तर अशी ही "सर्वगुणसंपन्न, नृत्यनिपुण, अष्टकलापारंगत' मनस्वी शाळेच्या पहिल्या स्नेहसंमेलनात धिटाईनं स्टेजवर उभी राहिली आणि नाचली, तेव्हा आम्हाला कोण आनंद झाला होता! घरी करून दाखवत असलेल्या सगळ्या स्टेप्स तिनं तिथे स्टेजवर जशाच्या तशा साकारल्या, तेव्हा आम्हाला खुद्‌कन हसूही आलं होतं. एकमेकींना टाळी देतानाचा गोंधळ तर पाहण्याजोगा! या धिटुकलीची ही धिटाई बघायला अख्खा परिवार लोटला होता.
मग डिसेंबरात दुसरं स्नेहसंमेलन आलं. "शाळेत नुसते डान्स नि गॅदरिंगच घेतात की काय,' पासून सर्व प्रचलित वाक्‍यांची पुन्हा पारायणं झाली. प्रत्यक्षात स्नेहसंमेलनाच्या दिवशी आधीच्या एवढी मजा आली नाही. एकतर तिथे शूटिंग करायला, फोटो काढायला शाळेनं अचानकच बंदी केली. त्यामुळं आमचा पोपट झाला. त्यातून मनस्वी एवढी चांगली नाचणारी असूनही तिला दुसऱ्या रांगेत उभं केल्यानंही आम्ही धुसफुसत राहिलो. म्हटलं, जाऊ द्या! पुन्हा कधीतरी बघून घेऊ!
या भक्कम पायाभरणीच्या जोरावर आमचे स्वप्नांचे इमले म्हणजे अगदी गगनाला भिडले होते. त्यामुळं तिच्या "बाल भवन'चं गॅदरिंग जाहीर झालं, तेव्हा तर मनस्वी "बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे' ठरणार, हे आम्ही मनातल्या मनात पक्कं करून टाकलं होतं! खोकला का काही कारण झालं आणि स्नेहसंमेलनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे, शेवटच्या प्रॅक्‍टिसला आम्ही तिला पाठवलं नाही. म्हटलं, करेल ती लक्षात ठेवून!
स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. विशेष ड्रेसकोड नव्हता, त्यामुळं मुलीला नटवताना आईची "हा ड्रेस की तो,' अशी त्रेधातिरपीट उडाली. सगळं साग्रसंगीत आवरून तिला बाल भवनात नेली. तिसराच डान्स तिचा होता. "बरं का रे मोरा' या गाण्यावर. ते गाणं बाल भवनचंच असल्यामुळं आम्ही आधी ऐकलेलं नव्हतं. आधीची तिची गाणी "आज गोकुळात रंग' आणि "उदे गं अंबे उदे' होती. मनस्वीच्या डान्सची वेळ आली आणि पडदा उघडला. मनस्वीसह तिघी मुली नाचणार होत्या आणि मुलगे मोरासारखे उभे राहणार होते. सुरुवातीच्या वाक्‍यानंतर तिन्ही मुलींनी पुढे येऊन मुलग्यांभोवती नाचायचं, असलं काहीतरी ठरलं असावं. दोघी मुली पुढे आल्या आणि त्यांचा ठरलेला नाच करू लागल्या. मनस्वीसुद्धा पुढे आली आणि स्तब्ध उभी राहिली. समोर कोण बसलंय, लाईट कुठे लावलाय, भानुदासकाका कुठे दिसताहेत, गटातल्या मुली आहेत का, आई-बाबांचे चेहरे दिसताहेत की नाही, वगैरे वगैरे कुतूहल शमविण्याचा ती प्रयत्न करत होती. गाण्याकडे तिचं ढिम्म लक्ष नव्हतं. बरं तिच्यासोबतचा मुलगाही तिच्याहून वरचढ निघाला. त्या बाबानंही काही तिला हलवलं नाही, की बाईंनी स्टेजवर येऊन ढकललं नाही. अख्खं दोन-तीन मिनिटांचं गाणं तिनं एका जागी उभी राहून "एन्जॉय' केलं.
त्या दिवशी संध्याकाळी तिचा मूड जाऊ नये, म्हणून दुपारी व्यवस्थित दामटून झोपवलं होतं. खायला घालून तिथे नेलं होतं. त्यामुळं यापैकी कुठली कारणं तिच्या "नॉन-परफॉर्मन्स'च्या आड येणारी नव्हती. तिनंही न नाचण्याचं कारण गुलदस्तातच ठेवलं. अजूनही ते आमच्यासाठी एक गूढच आहे!
"तारे जमीं पर'मधले पालक मुलावर अपेक्षांचं ओझं लादतात. आम्ही तिच्याबद्दलच्या अपेक्षांचं ओझं स्वतःवरच लादून घेतलं होतं, बहुधा. बाल भवनात त्या अपेक्षांचा फुगा फुटला. कानात बसलेले दडे अजून मोकळे होताहेत...!

Feb 4, 2009

ग्राफिटी रॉक्स!

ई-मेल आयडी काढून पाहिला, लोकांना थेट प्रतिक्रिया मागवून पाहिल्या, फोन करून झाले, एसएमएस पाठवून झाले, पण "ग्राफिटी'वरच्या प्रतिक्रिया एकत्रित स्वरूपात आणि वेळच्या वेळी कधी मिळत नव्हत्या। "ग्राफिटी'ची पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा, तसंच आम्ही प्रकट मुलाखती आणि गप्पांचा कार्यक्रम करू लागले, तेव्हा लोकांच्या "ग्राफिटी'वरच्या अमाप प्रेमाचा प्रत्यय यायचा। पण तो रोजच्या रोज प्रतिक्रियांतून कधी उतरायचा नाही।कार्यक्रमाच्या वेळी लोक कुठल्या कुठल्या जुन्या ग्राफिटींनी आवर्जून प्रतिसाद देतात. "अरे, एवढी जुनी ग्राफिटी लोकांना लक्षात आहे,' अशीच प्रतिक्रिया असायची आणि असते आमची अशा वेळी.

ग्राफिटी भरपूर आवडते, रोज आवर्जून वाचतो, अमकी ग्राफिटी मस्त होती, तमका शब्द तुम्हाला कसा सुचला, अशा प्रतिक्रिया मिळायच्या. पण रोजच्या रोज लोकांनी ग्राफिटी वाचून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी माझी अपेक्षा असायची आणि असते. संक्रांतीची गूळपोळी उत्तम झाली होती, हे गुढीपाडव्याच्या दिवशी सांगण्याला काहीच अर्थ नसतो ना?कधीकधी एखादी वेगळ्या विषयाची ग्राफिटी वापरली, की मीच लोकांना प्रतिक्रिया विचारायचो. लोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटायची, पण वेळ नसायचा किंवा कुठे द्यायची, हे कळायचं नाही.पण आता "ई-सकाळ'ने नवं रूप धारण केलं आणि लोकांना प्रतिक्रिया द्यायला उत्तम माध्यम मिळालं. आता लोक इथे रोजच्या रोज ग्राफिटीवर प्रतिक्रिया लोक देतात आणि त्यातून त्यांना काय आवडतं, काय नाही, याचाही अंदाज येतोय.

जय ई-सकाळ!

Khupach Chan ! Apratim ! Very Grate ! Ilike Very Much! Thank U ग्राफ्फिती

Kamat astana Grafiti vachli ki man ekdam tajatawane hote। Hats off.

Sakal is the real newspaper of real marathi man....and Grafity rocks as always...All the best to father of Grafity...

Salute to the inventor of the ग्राफित्ति

I am very happy ,for new look of sakal website।It will easy to read newspaper easily.Graffiti are just fantastic.

Hi, First of all congrants for NextGenreation Look of E-sakal। The Site looks are now much much better than earlier. Special Thanks for having a scroll of Graffitis where we are able to see the back dated Graffities. One Small Request if possible keep the old Grafitis in a archive section where we can take a look and enjoy the humrous One Liners. Wishing all the best and congrats to ESAKAL Tech Team for new look :)

I like this Grafity part of the Sakal the most। I have collection of many graffities with me. New look of SAkal is very good.

First of all would lika to say new ganeration of graffiti is very good and has some tallent।

Grafit is very good, and this presentation very very good,

Mala sarva Grfity farach avadalya aahet। Its just amazing !! Very Nice!!!

उत्साहाचं भरीत!

साहित्य ः प्रचंड उत्साह, चवीपुरता चटपटीतपणा, शोभेपुरता रंगेलपणा आणि बचकाभर ऊर्जा.

कृती ः प्रथम प्रचंड उत्साह शरीर आणि मनभर घुसळून घ्यावा. अंगात सर्वत्र भिनवून घ्यावा. वाटल्यास आपल्या पूर्वानुभवाचाही त्यासाठी वापर करावा. मग त्यात चवीपुरता चटपटीतपणा चांगला मिसळून घ्यावा. बचकाभर ऊर्जा या मिश्रणात बाद्‌कन ओतून चांगली ढवळून घ्यावी. अंगात मुरलेले हे मिश्रण सगळीकडे नाचून आणि वेडेवाकडे अंगविक्षेप करून चांगले खळबळून घ्यावे. स्वतःमध्ये घडत असलेल्या या नव्या प्रक्रियेची माहिती गावाला ओरडून सांगावी. त्याने या पदार्थाची चव आणखी वाढते. मग शोभेपुरता (म्हणजे सजावटीपुरता. "शोभा' होण्यापुरता नव्हे!) रंगेलपणा वर लावून ही पाककृती सजवावी.
केवळ हे मिश्रण उत्तमरीत्या तयार होऊन उपयोग नाही. मुख्य टप्पा आहे तो यापुढचा. या उत्साहाचं भरीत कसं करायचं, याचा. तर, हा सगळा जमवून आणलेला मामला (स्वतःच्या) निष्णात बायकोच्या हाती सुपूर्द करावा. मग या उत्साहाचं भरीत कसं होतं, हे डोळे भरून बघत बसावं. बायकोच असायला पाहिजे असं नाही, पण हल्लीच्या आण्विक कुटुंबांच्या (पक्षी ः न्यूक्‍लिअर फॅमिली) युगात स्वतःचं, हक्काचं (आणि भरवशाचं!) दुसरं कोण असणार जवळ? तशी दुसरी व्यवस्था असेल, तर हरकत नाही!

टीप ः ही पाककृती घडण्यापेक्षा बिघडण्यातच जास्त मजा आहे. त्यामुळं ती बिघडल्याचं फार वाईट वाटून घेऊ नये! ती त्याचसाठी होती, असं समजावं आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागावं!!