Jul 17, 2017

शेजारधर्म!

``नमस्कार. आत येऊ का?`` दारात उभ्या असलेल्या त्या अनोळखी गृहस्थांनी नम्रपणे विचारणा केली आणि शंतनुनं अदबीनं त्यांना नमस्कार करून दार उघडलं.
``अहो या ना, प्लीज!`` त्यानं दारात उभ्या असलेल्या त्या दांपत्याचं स्वागत केलं, पण हे नक्की कोण आहेत, हा उलगडा काही त्याला झाला नव्हता.
``सॉरी, आपली ओळख नाही आणि आम्ही असे अचानक तुम्हाला न कळवता आलो. डिस्टर्ब तर नाही ना केलं? `` त्यांनी पुन्हा नम्रपणा दाखवला.
``नाही हो. इट्स ओके. बसा ना.`` शंतनुने त्यांना खुर्ची दिली. दोघेही जरा स्थिरावले.
``आम्ही शारंगधर. इथेच, ह्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहतो.`` त्या दांपत्यानं खुलासा केला, तेव्हा शंतनुच्या मनातलं प्रश्नचिन्हही दूर झालं.
``अरे, हो का? सॉरी, मी ओळखलं नाही. आम्हीसुद्धा इथे नवीनच आहोत ना, जेमतेम एक महिनाच झालाय आम्हाला इथे येऊन.``
``हो, कळलं आम्हाला अध्यक्षांकडून. म्हणूनच तुमच्याकडे आलोय. आम्हालाही फ्लॅट विकायचाय. त्यासाठी तुमची मदत हवी होती.``
``अवश्य. बोला ना. शेजाऱ्यांना मदत करणं, हे कर्तव्यच आहे आपलं.``
``आम्हाला सोसायटीचा सॅंक्शन्ड प्लॅन पाहिजे होता. तो कुठेच मिळत नाहीये.``
``काय सांगता? सोसायटीकडे पण नाहीये? ``
``नाही. सगळीकडे प्रयत्न केले, कुठेच मिळेना, म्हणून शेवटी तुमच्याकडे आलो. तुमचा नुकताच व्यवहार झालाय, तुमच्याकडे तो नक्की असेल असं वाटलं. ``
``बरं झालं, तुम्ही आमच्याकडे आलात. अहो, आमच्या फ्लॅटच्या व्यवहाराच्या वेळेलाही असाच त्रास झाला होता आम्हाला. घर घेणं म्हणजे बाळंतपण पार पाडण्यासारखंच असतं. सगळा त्रास सहन करावा लागतो!`` बायकोनं आणून दिलेला चहा त्या दोघांना देत शंतनू म्हणाला. त्या दोघांनीही नको नको करत चहा घेतला.
``आम्हाला तर कुणीच मदत केली नव्हती. सगळयांनी अडवणूक केली. एका क्षणी तर आता काही घर होत नाही, असंच वाटून गेलं होतं. अगदी पार माणुसकी विसरून जातात लोक अशा व्यवहारात.`` शंतनूनं त्याची व्यथा सांगितली.
``हो ना.`` शारंगधरांनीही दुजोरा दिला.
``हा मॅप शोधण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडलं. महापालिकेत खेटे घातले, तिथल्या शिपायाला पैसे देऊन बघितलं, नगरसेवकाचा वशिला लावला, तरीही ढिम्म. शेवटी वैतागून गेलो. मग बॅंकेच्या वकिलानंच पाच हजार रुपये घेऊन करून दिलं आमचं काम. बहुतेक पैशांसाठीच अडवलं होतं!`` शंतनूचा सगळा संताप त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
``हे वकील इथून तिथून सारखेच. ग्राहकांना लुबाडण्यातच जन्म जाणार ह्यांचा!`` शारंगधरांनी त्यांचाही अनुभव सांगितला.
``खरंतर आमच्या आधीच्या मालकांनीच हा प्लॅन आम्हाला द्यायला हवा होता. पण काय करणार, गरज आमची होती ना, आमचे हात दगडाखाली होते. बॅंकेचें कर्ज नामंजूर झालं असतं, म्हणून आम्हीच सोसला तो भुर्दंड. अक्कलखाती गेले म्हणायचं, आणि गप्प बसायचं!`` शंतनूनं त्यांच मन मोकळं केलं.
``हो, हे खरंय. पण तुमच्यासारखी माणसं भेटली, की जगात माणुसकी शिल्लक असल्याची खातरी पटते.`` शारंगधर चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले. एव्हाना शंतनूने तो प्लॅन शोधून त्यांच्यासमोर उलगडला होता. त्यात त्यांचा फ्लॅट स्पष्ट दिसत होता. त्यांचं काम झालं होतं. हा प्लॅन त्यांना चालणार होता. त्यांचा चेहरा एकदम खुलला.
``हेच तर हवं होतं मला. कॉपी काढून घेण्यापुरता मला हा द्याल का?``
``अरे, म्हणजे काय! अर्थातच. काही प्रॉब्लेम नाही. घेऊन जा तुम्ही. ``
``थॅक्यू. थॅंक्यू शंतनू साहेब.``
``अहो थॅंक्यू काय? शेजारी आहात तुम्ही आमचे. एवढं तर करायला हवंच ना माणुसकी म्हणून! `` शंतनूने हसून उत्तर दिलं आणि शारंगधर आणखी कृतकृत्य झाले. असे शेजारी आणखी काही काळ लाभायला पाहिजे होते, आपण उगाच फ्लॅटचा व्यवहार लवकर करतोय, असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. ते दारातून बाहेर पाऊल टाकणार, तेवढ्यात शंतनूचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर आले, ``आम्हाला प्लॅनसाठी पाच हजार रुपये पडले होते, म्हणून तेवढेच तुमच्याकडून घेतोय. झेरॉक्स काढून आणल्यावर दिलेत तरी चालतील. काही घाई नाही. माणुसकी सोडलेली नाही आम्ही वकिलांसारखी!``

ता. क.

``माझ्यासाठी हा निकाल अतिशय दुःखदायक होता. अशी कामं करायला कधीकधी जिवावर येतं, पण काय करणार, हा आमचा व्यवसाय आहे. असो. तुमच्या दोघांच्याही भावी आयुष्याला शुभेच्छा. आनंदी राहा.`` खूप जड अंतःकरणाने वकील साहेबांनी प्रणव आणि अवनीला शुभेच्छा दिल्या.
प्रणव आणि अवनीलाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांच्या आयुष्यातला हा कदाचित सर्वांत कटू दिवस होता. दोघांनी गेली दोन वर्षं एकमेकांशी खूप चर्चा केली, खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आपापसातले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. नाइलाजानं तो निर्णय घ्यावा लागला होता...एकमेकांपासून वेगळं होण्याचा.
खरंतर त्या दोघांचा प्रेमविवाह. एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झालेली. ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून लग्न, असा रीतसर प्रवास पाच वर्षांचा होता. प्रेम आंधळं का कसंतरी असतं असं म्हणतात, ते प्रणवला लग्नानंतर जाणवायला लागलं. किरकोळ कारणावरून त्याचे अवनीशी खटके उडायला लागले. अवनीचा अतिव्यवस्थितपणा आणि नियमानुसार वागण्याचा अतिआग्रह हेच आधी त्यांच्यातल्या प्रेमाचं आणि नंतर विसंवादाचं कारण ठरलं होतं. अवनी मराठीची प्राध्यापक. अतिशय बुद्धिमान. तर प्रणव जगण्याकडे हसतखेळत बघणारा, छोट्या चुका नजरेआड करणारा, स्वच्छंदी. हे दक्षिण आणि उत्तर ध्रुव काही एकत्र येऊ शकले नाहीत. आपलं एकमेकांवर प्रेम असलं, तरी आपण एकत्र संसार करू शकत नाही, या निर्णयावर ते आले आणि सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. पुढील कायदेशीर अडथळेही सुरळीत पार पडले.
घटस्फोट मंजूर झाल्याच्या दिवशी ते पुन्हा भेटले, तेव्हा नाही म्हटलं तरी दोघांच्याही काळजात काहीतरी हललंच. प्रणवनं तिला एक पत्र दिलं. ओळख झाल्यापासून अशी अनेक पत्रं त्यानं तिला लिहिली होती. आजचं हे कदाचित शेवटचं होतं. त्यानं लिहिलं होतं, ``अवनी, तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी व्यक्ती ज्याच्या आयुष्यात असेल, तो खरंच भाग्यवान. काही काळासाठी मला हे भाग्य लाभलं, पण मी दुर्दैवी ठरलो. आयुष्यभरासाठी तुझी सोबत मिळू शकली नाही. पुढच्या काळात तुझी साथ नसली, तरी तुझ्याबरोबर घालवलेल्या काही चांगल्या क्षणांची आठवण काढून मी तो काळ निभावून नेईन.
कायम हसत राहा, सुखी राहा.
ता. क. :
आणि हो, आणखी कुणावर माझ्यासारखंच अमाप प्रेम केलंस, तर माझ्याप्रमाणे त्याच्या व्याकरणाच्या चुका काढत जाऊ नकोस. बाय!``
घरी आल्यावर प्रणवचं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचताना अवनीचे डोळे भरून आले. आता बरंच काही घडून गेलं होतं, पण हा कटू निर्णय बदलता आला असता का, असा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. तिनंही हातातली कामं बाजूला ठेवून प्रणवला एक भावनिक पत्र लिहिलं. आजपर्यंतचं कदाचित मायेचा सर्वाधिक ओलावा असलेलं ते पत्र होतं. सगळं पत्र पूर्ण झाल्यावर तिनं लिहिलं,
`ता. क. `व्याकरणा`च्या नाही रे, `शुद्धलेखना`च्या!`

रॉंग नंबर

``हाय!``
``हाय डिअर``
``व्हॉटस अप?``
``हो, व्हॉटस अपवरच आहे मी. बोल ना.``
``अगं, ते माहितेय. व्हॉटस अप म्हणजे, काय चाललंय?``
``बसलेय निवांत. तुला आज माझी कशी काय आठवण?``
``कशी काय म्हणजे काय? मला रोजच तुझी आठवण येते. ``
``खरंच? लव्ह यू डिअर. काय करतोयंस तू? ``
``ऑफिसमध्ये खर्डेघाशी. दुसरं काय करणार? बरं, तू डीपी का ठेवला नाहीयेस? ``
``सहज. तुला माहीत नाही, मी डीपी काढलेला? ``
``अं...अगं नाही, नसेल लक्ष गेलं. सॉरी.
``इटस ओके. पण नावावरून तर कळलं असेलच ना?``
``अगं नाही, मी तुझा नंबर वेगळ्याच नावानं सेव्ह केलाय. एनीवे. ऑफिसमध्ये जरा बोअर झालं म्हणून तुला पिंग केलं. ``
``सो नाइस ऑफ यू! आज एवढं छान वाटतंय ना, पहिल्यांदा बोलतोयंस तू असं.``
``अगं मनात असतं, पण नेहमी बोललं जातंच, असं नाही. You know, I am so lucky to have you in my life. ``
``रिअली?``
``I mean it. योग्य वेळी तू भेटली नसतीस, तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक!``
``same here. आज तू एवढं मनापासून बोलतोयंस, खरंच खूप बरं वाटतंय. ``
``माझ्यासाठी खूप करतेस तू. मी खरंच त्याची परतफेड नाही करू शकत.``
``It's ok darling. असं बोलून दाखवायची गरज नसते. ``
``डार्लिंग म्हटलंस आणि अंगावर शहारा आला बघ. आता ऑफिसमध्ये लक्ष लागणार नाही माझं. ``
``हं. मग माझी आठवण काढत काम कर, म्हणजे फास्ट काम होईल. ``
``कधी भेटायचं? ``
``तुला वेळ झाला की, जानू. ``
``जानू? इश्श!! खूप वेगळं बोलतोयंस तू आज, सोनू. आता तर तुला भेटायची कधी नव्हे एवढी ओढ लागलेय. ``
``हं. भेटूच. बरं ऐक, एक महत्त्वाचं सांगायचं होतं. ``
``बोल ना. ``
``हे असं लाडिक आणि खाजगी चॅट करणं धोकादायक असतं. अशा नात्यात आपण जास्त काळजी घ्यायला हवी. तू चॅट लगेच डिलीट करून टाकत जा हां!``
``का रे? त्यात कसला एवढा धोका? ``
``अगं, उगाच प्रॉब्लेम नको. तुझ्या ऑफिसमध्ये, घरी कुणी तुझा मोबाईल बघितला तर... ``
``कुणी नाही बघत.``
``तरीही काळजी घे. आणि दुसरं म्हणजे माझ्याशी चॅट करताना चुकून दुसऱ्या कुणाला जाणार नाही, याची काळजी घे. ``
``म्हणजे? ``
``अगं, चुकून आपलं चॅट दुसऱ्या कुणाला गेलं, तर प्रॉब्लेम होऊ शकतात. परवा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राचा असाच लोच्या झाला. ``
``काय? ``
``त्याला वाटलं आपण आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट करतोय आणि चुकून तो बायकोशी बोलत होता. घरी गेल्यावर बायकोनं धू धू धुतला.``
``वा! पण तू हे मला का सांगतोयंस, मला कळलं नाही. नवऱ्याशी काहीही बोलेन मी चॅटवर. कुणाची भीती बाळगायची काय गरज आहे? ``
``डार्लिंग, आपण नवरा-बायको झालो नाहीये अजून. आपल्याला एकत्र येण्यात अनेक अडथळे आहेत. यू बेटर नो. ``
``तू काय बोलतोयंस? बरा आहेस ना? आपलं लग्न होऊन पाच वर्षं झालेयंत राजा! मी प्रणिती बोलतेय, तुझी बायको! मला वाटलं आता नोकरीसाठी मी नाशिकला असते, म्हणून तू माझ्याशी चॅट करत होतास. तुला नक्की कुणाशी बोलायचं होतं?``
(काही मिनिटं स्मशानशांतता....)
``अनिकेत, r u there? Hello…reply immediately. अनिकेत....हे बघ, तू आहेस ऑनलाइन. मला दिसतोयंस तू. उगाच रेंज नाही वगैरे कारणं सांगू नकोस. मला उत्तर दे. थांब...मी उद्याच्या उद्या पुण्याला येतेय. मग करू आपण समोरासमोर चॅटिंग!``

सहानुभूती


``तुला तर माहितीच आहे ना, मी कसा माणूस आहे ते? माझ्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय तिनं! विश्वासघाताचा आरोप! मी तिला फसवू शकतो का? तिलाच काय, मी कुणालातरी फसवू शकतो का? असा लबाड माणूस वाटतो का मी?`` तो अगदीच सैरभैर झाला होता. खचून गेला होता. त्याला एवढं निराश झालेलं कधीच कुणी बघितलं नव्हतं. तो आत्तापर्यंत कायम स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगत आला होता. कधी कुठल्याही गोष्टीसाठी कुणावर अवलंबून राहिला नव्हता. आज मात्र त्याची उमेद पार खचली होती. आता तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही, असंच कुणालाही त्याच्याकडे बघून वाटलं असतं.
``एवढी वर्षं एकत्र राहिलो आम्ही आणि आता ती माझ्यावर असे आरोप करतेय. मी तिला फसवलं, असं सांगून आजच घटस्फोटासाठी अर्ज केलाय तिनं. मी काय करू? तिच्यावरचं प्रेम पुन्हा सिद्ध करून दाखवू का? `` तो पुन्हा रडायला लागला.
``एवढं प्रेम होतं आमचं एकमेकांवर, तरीही तिनं माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला! मी इमोशनल बोलून कायम सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणाली ती. इमोशन्स वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो? मी? तुला तरी पटतं का हे? तुझ्या बाबतीत तरी कधी केलंय का मी असं?`` त्यानं पुन्हा डोळ्यांत पाणी आणून तिला विचारलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो पुन्हा हमसाहमशी रडायला लागला.
``राजा, तू रडू नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच अशी दुसऱ्याची भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीस रे, माझ्या सोन्या!`` ती त्याच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाली. तिनं त्याला आधार देण्यासाठी मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूधारा ओघळायला लागल्या...

Jun 26, 2017

नीतिमत्ता!


संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात मुख्य रस्त्याच्या कॉर्नरला असलेलं ते रेस्टॉरंटसुद्धा उत्साहाने फुललं होतं. संधिप्रकाश दारंखिडक्यांतून झिरपत आत येत होता आणि आकर्षक रंगसंगती केलेल्या टेबलांवरची सजावट आणखी खुलून दिसत होती. बाहेरची वाढती रहदारी, लोकांची घरी जाण्याची घाई, मध्येच गाडी पुढे घेण्यावरून होणारी भांडणं बघत आलं-वेलची टाकलेल्या चहाचे घोट घेत निवांत बसणं, हा अनेकांचा संध्याकाळचा विरंगुळा होता. त्या दिवशीही हे रेस्टॉरंट अशाच दर्दींच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. अपवाद होता, तो फक्त एका टेबलचा. या टेबलावरचे सगळेच जण सुतकी चेहऱ्यानं एकमेकांकडे बघत बसले होते. कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी एकानं पुढाकार घेतला आणि मौनव्रताची कोंडी फुटली. ते सगळे एकाच ऑफिसमध्ये काम करणारे होते, पण वेगळ्या विभागांतले. ऑफिसमध्ये रोज तसा एकमेकांशी संबंध येत नसे. येई तोसुद्धा कामापुरता. ऑफिस व्यवस्थित चाललं होतं, कामाचंही फार टेन्शन नव्हतं आणि हाच त्यांच्या चिंतेचा विषय होता.
``आपण व्हॉट्स अप ग्रुप सुरू करूया का?`` एकानं काडी टाकली आणि सगळे खाऊ का गिळू नजरेने त्याच्याकडे बघायला लागले.
आपण असं काय देशद्रोही विधान केलं, हे न कळून तो बिचारा कानकोंडा झाला. इतरांच्या बोलण्यातून त्याला कळलं, की ऑफिसमधला कामाचा शीण घालवण्यासाठी व्हॉटस अप ग्रुप तयार करण्याचा उपाय सुचवणारा तो काही जगातला पहिला माणूस नव्हता. याआधीसुद्धा हा विचार कित्येकदा पुढे आला होता आणि मागे पडला होता. ऑफिसमधलं गॉसिप नको, मेसेज वाचण्यातच खूप वेळ जातो, लोक काहीही फॉरवर्ड करतात, अशा अनेक तक्रारी होत्या. त्याबरोबरच एक मुख्य आक्षेप होता, तो म्हणजे काही आगाऊ पुरुष सदस्य या कॉमन ग्रुपवर असभ्य जोक्स टाकतात, हा. ती भानगडच नको म्हणून कधी या ऑफिसचा ग्रुपच स्थापन झाला नव्हता. यावेळी मात्र अशा ग्रुपशिवाय तरणोपाय नाही, असाच निष्कर्ष या चर्चेत निघाला आणि लगेच शिक्कामोर्तब आणि अंमलबजावणीही झाली.
अर्थात, ऑफिसच्या साडेचार वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीतला पहिला व्हॉट्स अप ग्रुप स्थापन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीआधी ग्रुपच्या अटी आणि नियम ठरवणे आवश्यक होते. हिशेब आणि नियमावलीच्या बाबतीत चोख असलेल्या एका सहकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. बाकीही कुणाकुणावर अशाच जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी म्हणजे ग्रुपच्या सदस्यांना काबूत ठेवणे आणि त्यांचा तोल सुटू न देण्याची होती, ती त्या ग्रुपचा प्रस्ताव पुन्हा नव्याने मांडणाऱ्या त्या नव्या सदस्याची होती. त्या निमित्तानं त्याची सगळ्यांशी पुन्हा ओळख झाली. त्याचं नावही त्याच्या स्वभावाला साजेसंच होतं – प्रीतम. अल्पावधीत तो सगळ्यांचा `प्रीतम` झाला.
ग्रुपमुळे ऑफिसमुळे नवं चैतन्य आलं, लोकांचा कामातला हुरूप वाढला, सगळे एकमेकांशी खेळीमेळीत राहू लागले. ऑफिसच्या कामातला रुक्षपणा संपून तिथे नवा उत्साह आला, कार्यक्षमताही वाढली. एकूण सगळीकडे आनंदीआनंद झाला. लोक काटेकोरपणे नियमांचं पालन करत होते, ग्रुपवर काही वाह्यात, अवाजवी, थिल्लर चर्चाही होत नव्हती. थोडक्यात, सगळे आटोक्यात होते आणि नियम पाळत होते. ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश प्रचंड यशस्वी झाला होता.
...आणि अशाच उत्साही वातावरणात एके दिवशी भूकंप झाला! ग्रुपवर हलकल्लोळ माजला, प्रचंड उलथापालथ झाली. ग्रुपच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. कारणही तसंच घडलं होतं. एवढ्या साध्या, सरळ, सोज्वळ वाटेने चाललेल्या ग्रुपवर एक अश्लील व्हिडिओ येऊन पडला होता. ग्रुपच्या सगळ्या नियमांना एका फटक्यात सुरुंग लागला होता. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर साक्षात एडमिनकडूनच हा प्रमाद घडला होता! सगळ्यांचा `प्रीतम` असलेला एडमिन एका फटक्यात सगळ्यांच्या रागाचा धनी बनला होता. अपेक्षेप्रमाणेच सगळ्यांनी त्याला सोलून काढला. तो सगळ्यात ज्युनिअर असतानाही एडमिन म्हणून सगळ्यांना गुरकवायचा, त्याचा हूट एका क्षणात निघाला. प्रीतम हडबडला. खरंतर त्याच्याकडून ही चूक नकळत घडली होती. एवढ्या प्रेमानं निर्माण केलेला, प्राणपणानं जपलेला, सगळ्या ज्येष्ठश्रेष्ठांच्या भावना जपून चालवलेला ग्रुप एका क्लिपमुळे उद्ध्वस्त होणार होता. इतर कुणी टाकलेल्या एखाद्या थोड्याशा वाह्यात विनोदावरही ज्येष्ठांनाही ग्रुपवरच खडे बोल सुनावणारा प्रीतम आज नैराश्याच्या गर्तेत गेला होता. प्रीतमनं ग्रुपवर `सॉरी` एवढाच मेसेज टाकला आणि तो मौनात गेला.
दुसऱ्या दिवशीही ग्रुपवर स्मशानशांतता होती. प्रीतम ग्रुपवरच नव्हे, तर ऑफिसलाही फिरकला नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी प्रीतमला जाग आली, तेव्हा त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अपचे कितीतरी पर्सनल मेसेज आलेले होते. बहुधा आणखी बरंच काही ऐकून घ्यावं लागणार, या काळजीनं त्यानं भीतभीतच मेसेज वाचायला सुरुवात केली.
``प्रीतम, झालं ते झालं. तूसुद्धा मुद्दाम काही केलं नव्हतंस. आपण काय घडलं ते विसरून जाऊ. मी बाकीच्यांनाही समजावेन. तू परत ये.`` प्रीतमला मेसेज वाचून समाधान वाटलं. त्यानं हसरा इमोजी पाठवून आपलं समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा मेसेज वाचला गेल्याचं नोटिफिकेशन आल्यावर लगेच पुढचा मेसेज आला - ``परवाची क्लिप चांगली होती. अशाच आणखी आहेत का?``
प्रीतम उडालाच. काही प्रतिक्रिया द्यायच्या आधी त्यानं बाकीच्या सहकाऱ्यांकडून आलेले पर्सनल मेसेज बघितले. त्यांचाही आशय बहुतांश तसाच होता. एवढ्यात प्रीतमला काही महिला सदस्यांचेही मेसेज दिसले. बहुधा परवाच्या प्रकरणाबद्दलच त्यांनी आपले वाभाडे काढले असतील, असं समजून त्याला ते उघडायचं धाडस होईना. पण बऱ्याच जणींचे मेसेज बघून त्याला राहवलं नाही. त्यानं ते उघडून बघितले आणि त्याला पुन्हा जोरदार धक्का बसला.
त्या मेसेजमधलाही आशयही जवळपास तसाच होता!

-       अभिजित पेंढारकर.