Jan 22, 2008

गोष्ट `मनस्वी`च्या मनस्वितेची!


बरेच दिवस लिहीन, लिहीन म्हणत होतो, पण मुहूर्तच सापडेना.
आज प्रकर्षानं लिहावंसं वाटतंय.आमच्या कार्टीबद्दल!
अर्थात, आमची लाडकी मनस्वी. एकुलती एक मुलगी. आम्ही तिला लाडानं "कार्टी' म्हणतो. आम्ही म्हणजे, अर्थातच मी!

आपल्या मुलाचं कौतुक प्रत्येकालाच करावंसं वाटतं. त्यामुळं आमची पोरगी काही जगावेगळं करतेय, असं नाही, पण ते जगावेगळंच आहे, असा एक पिता म्हणून माझा ठाम विश्‍वास आणि दावा आहे. त्यामुळं तुम्हाला ते फारच पर्सनल किंवा आगाऊपणाचं वाटत असेल, तर सोडून द्या बापडं!ही कार्टी हल्ली फारच शेफारलेय. तीन वर्षांची झाल्यामुळं तिला जास्तच शिंग फुटल्येत. त्यातून शाळेत काय काय शिकून येते आणि घरी आमची शाळा घेत असते. कधीकधी पोरं मोठ्यांचं ऐकून मोठ्यांसारखं बोलायला जातात आणि त्यातून आपल्याला हसू आवरेनासं होतं. काल तिला पाळणाघरात सोडायला निघालो होतो. मला ऑफिसला जायची घाई होती आणि कोणत्याही परिस्थितीत तिला तिकडे राहण्यासाठी पटवणं भाग होतं. तर मलाच म्हणते कशी, "बाबा, तुम्ही का..............ही काळजी करू नका. मी राहीन काकूंकडे. तुम्ही जा ऑफिसला.'

मी चाटच पडलो.
तीन वर्षांच्या चिमुरडीला एवढी अक्कल? कुठून तरी ऐकायचं आणि फेकायचं आयशी-बापसाच्या तोंडावर!परवा मला म्हणते, "बाबा, तुम्ही आईचे कोण आहे? (पुणेरी ना! "तुम्ही कोण आहे' हीच भाषा. "तुम्ही कोण आहात' नाही!) नवरा ना?'

मी पुन्हा फ्लॅट.

आज हा किस्सा माझ्या मेव्हणीला सांगितला, तर पुढे तुळशीपत्र जोडलं, "आणि आई तुमची कोण? "नवरी' ना?'घरी रिकामी असली, की सगळे खेळ काढून आणि तिची पुस्तकं, फळं, चित्रं मांडून आमचीच परीक्षा घेत असते. मग आम्ही तिच्या शाळेतले कणाद, यश, अथर्व, स्वराली, रमा वगैरे कुणीतरी असतो आणि ती आमची दीप्ती किंवा प्राची टीचर!मग एकेक वस्तू रुमालात लपवायची आणि आम्हाला ओळखायला सांगायची. आता ती लपवताना तिनं बघितलेली असते. पण आम्ही कशी ओळखणार? मग अंदाजे काहितरी ठोकून द्यायचं. ते चुकलं, तर पटत नाही. पण यदाकदाचित बरोबर आलं, तर आम्हाला शंभरपैकी शंभर मार्क!सध्या आमच्या दोघांच्याही नोकऱ्यामुळे तिचे थोडेसे हाल होताहेत. म्हणजे, तीन तास शाळेव्यतिरिक्त दोन तास पाळणाघरात राहावं लागतं. दुपारी कार्टी झोपत नाही तिथे आणि मग रात्री सात-साडेसातलाच झोपून जाते. पण एकूण मजेत आहे. ती आणि तिच्यामुळे आम्हीही!
--------

Jan 14, 2008

अरे "बाप'रे!

करण जोहर नावाचा एक मोठ्ठा दिग्दर्शक आहे. (कोण रे तो टवाळ, त्याचे सिनेमे पाहून असं वाटत नाही, असं म्हणतोय?)

मोठ्ठा म्हणजे यश, भपका, (अरे भंपका!), चमचमाट, झगमगाट, मोठमोठ्या ताऱ्यांचा लखलखाट (चित्रपटीय भाषेत याला "भव्यदिव्य' म्हणतात) या बाबतीत मोठ्ठा. लहान वयातही महान. शाहरुख खान, फराह खान, मनीष मल्होत्रा, गेला बाजार शंकर-एहसान-लॉय यांचा जिगरी दोस्त. कुठे शाहरुखला "केबीसी'साठी तयार कर, कुठे फराह खानला हनिमूनची तिकिटं काढून दे, मनीष मल्होत्राच्या नव्या दुकानाचं (बुटीक?) इंटिरिअर सुचव, अशी मित्रांसाठी पडेल ती ("पडेल' नव्हे!) कामं करणारा. अधूनमधून सिनेमेदेखील दिग्दर्शित करणारा. त्यातून छान छान मुली, गोड गोड दृश्‍यं, सुंदर सुंदर स्थळं दाखवणारा. भावनासम्राट! प्रेक्षकांचे डोळे आणि हृदयं पिळून गंगा, यमुना, सरस्वतीही दुथडी भरून वाहतील एवढा अश्रूंचा पूर काढणारा.

एवढं सगळं वर्णन अशासाठी, की हा भला गृहस्थही आमीर खानचा "तारे जमीं पर' पाहून हेलावला. त्याला आता "पालक' (याचा अर्थ पिता; भाजी नव्हे) व्हावंसं वाटायला लागलंय. ""मी आत्तापर्यंत लग्न केलेलं नाही. करायचा विचारही नाही; पण "तारे...' पाहिल्यानंतर पिता म्हणून आपल्या मुलाला समजून घेण्याची गरज मला वाटू लागलीय,'' असं त्यानं जाहीर केलं.पिता बनण्याची त्याची मनीषा लवकरच पूर्ण होवो. तो चित्रपटातला असल्यामुळे "व्हर्च्युअली' पिता वगैरे बनण्याची साधनाही करू शकतो.

आम्हाला काळजी वेगळीच आहे. करणने तर स्वततिकीट काढून, थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितलाय. त्याच्या मनात काय भावना आहेत कोणास ठाऊक? पण आता, चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बुजुर्ग कलाकारांसाठीही आमीर आता "तारे जमीं पर'चा विशेष खेळ आयोजित करणार आहे, म्हणे!

Jan 7, 2008

बोलबाला `ग्राफिटी'चा!

सर्वांसाठी वैचारिक शिदोरी

आज नववर्षाच्या स्वागताचा दिवस. वाचकांशी आपुलकी व जिव्हाळा जपणाऱ्या "सकाळ'चा आज वर्धापनदिन. नववर्षदिन व "सकाळ'चा वर्धापनदिन हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. "सकाळ' बातम्यासोबतच वाचकांना प्रेरणा, मुक्तपीठ, फॅमिली डॉक्‍टर, पुराणकथा, संस्काराची शिदोरी असे बरेच काही देत असतो. जीवनातील दोषांची जाणीव मोजक्‍या शब्दांतील ग्राफिटीमुळे होते. चिंटू चित्रमालिकेने वाचकांना सतत हसत ठेवले आहे. बालमित्र पुरवणी वाचताना बालगोपाळ रंगून जातात. "सकाळ' सर्वांसाठी विचाराची काही ना काही शिदोरी विविध रूपांनी देत असतो. पुणेकरांची सकाळ "सकाळ'च्या वाचनानेच सुरू होते. वर्धापनदिनी "सकाळ'ला शुभेच्छा.

- यशवंत पवार, पुणे

---

विश्‍वासार्ह बातम्या व उत्तम अग्रलेख

अनेक वर्षांपासून "सकाळ' पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागांतही "सकाळ'ची लोकप्रियता वाढत आहे. कालानुरूप बदल करीत हा अनुभवी प्रवास असाच उत्तमोत्तम यशोशिखरे गाठत राहील, याची खात्री आहे. प्रेरणा, मुक्तपीठ, सप्तरंग यांसारख्या पुरवण्या, अनेक वाचकप्रिय सदरे, विश्‍वासार्ह बातम्या, उत्तम अग्रलेख, थोड्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारी ग्राफिटी या सर्वांमुळे "सकाळ' अढळस्थानी आहे व यापुढेही राहील.

- सिद्धार्थ बेंद्रे, पुणे

----------------------

हे पण वाचा!


http://marathigraffiti.blogspot.com/

Jan 1, 2008

पीक "प्रेरणा' पेरणाऱ्यांचं...

बॉलिवूडकरांचं चित्रपट काढण्यामागचं "इन्स्पिरेशन' काय असेल, सांगता येत नाही. पूर्वी रामसेंचे "हॉररपट' पाहून प्रेक्षकांना हुडहुडी भरायची. अर्थातच त्यातल्या प्रसंगांच्या परिणामामुळं नव्हे, तर याला हे आणखी किती दिवस असे सिनेमा काढणार, या विचारांनी! जगातल्या समस्त कवट्या, प्रेतं, जंगलं, स्मशानं, हेच रामसेंचं "इन्स्पिरेशन' होतं. कवटीचं तर त्यांना एवढं प्रेम होतं, की चोर-दरोडेखोरांसारखं समस्त रामसे बंधूंच्या कपाळावर कवटीचं चित्र कोरलेलं असेल की काय, असंच वाटायचं.

देशप्रेम हे मनोजकुमारचं "इन्स्पिरेशन' होतं. पण नंतर त्याचा डोस एवढा झाला, की साक्षात भारतमातेलाही कसंसंच व्हायला लागलं असणार. प्रेमाचे पैलू हे काही प्रमाणात राज कपूर आणि यश चोप्रांचं "इन्स्पिरेशन' होतं. प्रेमाच्या या अंगाला नायिकांच्या अंगप्रत्यंगांचा जोड राज कपूरनं दिलं. यश चोप्रांनी तर सगळ्या प्रेमकथांना श्रीमंतीतच लोळवून घोळवून सादर केलं.राखी सावंतला नाही का, "नच बलिये'मधल्या पराभवानंतर अंतरात्म्याच्या आवाजाचं "इन्स्पिरेशन' मिळालं. म्हणूनच आपल्या फसवणुकीविरुद्ध गावभर बोंबलत सुटली ना ती!

आमीर खानला "लगान'च्या वेळी चांगल्या कथेमुळे निर्मितीचं आणि "तारे जमीं पर'च्या वेळी अमोल गुप्तेशी भांडणामुळे दिग्दर्शनाचं "इन्स्पिरेशन' मिळालं.तर असे हे सगळे "इन्स्पिरेशनिस्ट'! आत्ता सगळ्यांची आठवण होण्याचं कारण हे, की नुकताच आलेल्या "रिटर्न ऑफ हनुमान'चं "इन्स्पिरेशन' आधीचा "हनुमान' नाही, तर दिग्दर्शक अनुराग कश्‍यप हे आहे. आपले कुठलेच चित्रपट सात वर्षांच्या आपल्या मुलीला आवडले नाहीत, म्हणून अनुरागनं तिला "इम्प्रेस' करण्यासाठी हा चित्रपट केलाय, म्हणे!

आमची भीती दुसरीच आहे.गौरी खाननं "टाईम'साठी दिलेल्या बोल्ड फोटोवरून सगळ्याच ताऱ्यांच्या बायकांनी, हिमेश रेशमियावरून समस्त उदयोन्मुख गायकांनी, रामगोपाल वर्माच्या "आगी'वरून "शोले'च्या समस्त चाहत्यांनी काही "इन्स्पिरेशन' घेतलं, तर त्यांना आणि आपल्यालाही महागात पडेल!

---

Dec 31, 2007

वर्षा'व प्रेमाचा...


कसे म्हणुनी काय पुसता, आम्हास गेले वर्ष यंदाचे।
होते गुणगौरवाचे, परदेशवारीचे, अन्‌ "धंद्या'चे।।

जानेवारीत घडला पहिला "ग्राफिटी' प्रकाशन सोहळा।
उतरविले ज्याने भूवरी लोकप्रिय मराठी "तारकादळां'।।

वेगळी ओळख जाहली स्वतःची स्वतःला, या पुस्तकामुळेच।
स्वप्रतिभेविषयी राहिलो असतो नाहीतर आम्ही "खुळे'च।।

फेब्रुवारीत मग अनपेक्षितपणे घडली मलेशियावारी।
परदेशदर्शनाचा विषय आम्ही त्याआधी नेला होता, हसण्यावारी।।

मार्चही गेला आनंदात अन्‌ एप्रिल, मे महिनाही।
आंबे आणून विकण्याचा झाला सफल प्रयोगही।।

जून आला पाऊस घेऊन अन्‌ तब्येत सुधारली।
"ड्यूक्‍स नोज'मध्ये डुंबून आंदर मावळाची वाट धरली।।

जुलैत पुन्हा आला "ग्राफिटी'चा दुसरा भाग।
दिसण्यासारखा फोटो आला, "सकाळ'मध्ये पहिल्यांदाच।।

ऑगस्टपासून मग "ग्राफिटी'च्या चाहत्यांची लाईनच लागली।
मुलाखती अन्‌ जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणेही मिळू लागली।।

मिळाले नवे मित्र-मैत्रिणी, तसेच उत्तम टीकाकारही।
सगळ्यांच्याच प्रेमाने वाढलो, विकसित झाली "ग्राफिटी'ही।।

प्रेम मिळवायचे आणखी अन्‌ असलेले टिकवायचे आहे।
संकल्प दुसरा नाही गड्यांनो, नववर्षात हेच घडवायचे आहे।।

-----------