जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Jan 30, 2009
कुणी घर सांगता का घर?
पत्ते शोधण्याची आणि लक्षात ठेवण्याची आमची ही नेहमीची बोंब! पुण्यात आता बारा वर्षे होतील, पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला!
पत्ता शोधण्याचा केलेला एक आंतरराष्ट्रीय पराक्रम अद्याप लक्षात आहे. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना एकदा नियतकालिकाचे काम त्या रात्रीतच पूर्ण करायचे होते. आमची रत्नागिरीची एक मैत्रीण तिच्याकडचे लेख घरीच घेऊन गेली होती. ते तिच्याकडून मिळवून टाईप बिईप करून घ्यायचे होते. त्या काळी मोबाईल वगैरे काही नव्हते. (असं म्हणायची पद्धत आहे म्हणून नव्हे, पण खरंच तेव्हा नव्हते!) तिचा पत्ताही आम्हाला धड ठाऊक नव्हता. फक्त तिच्या सोसायटीचं नाव माहित होतं आणि कर्वेनगरमध्ये कुठेतरी राहते, एवढंच कुणीतरी सांगितलं होतं.
आम्ही रात्री अकरा वाजता अख्ख्या कर्वेनगरात तिचा पत्ता शोधायला प्रारंभ केला. मी आणि एक मित्र. तिच्या सोसायटीच्या समजलेल्या नावाशी साधर्म्य असलेल्या सोसायट्या धुंडाळू लागलो. एकतर पुण्याच्या उपनगराचा तो भाग. रात्री साडेनऊ-दहालाच दारंखिडक्या लावून गुडूप होण्याची अहमहमिका. त्यामुळं तिचा पत्ता शोधणं समुद्रातून मोती शोधण्याएवढंच अवघड असल्याचं आम्हाला लगेचच लक्षात आलं. पण आमची चिकाटी कुणाच्या बापाला भीक घालणार नव्हती!
काही सोसायट्या धुंडाळून नावांच्या पाट्या तपासल्या. त्यात कुठे ओळखीचं आढळलं नाही. तिचा पत्ता शोधताना आम्हाला लक्षात आलं, की तिचं सासरचं आडनावच आम्हाला ठाऊक नाहीये! आणि माहेरच्या आडनावावरून लक्षात राहायला ती काही माधुरी दीक्षित नव्हती!! तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा त्या सोसायटीच्या भिंतीपाशी गेला आणि मळकट-कळकट पाट्यांवरची नावे शोधण्याचे ते कष्टप्रद काम त्याने पुन्हा उरावर घेतले. ते शोधताना त्याच्या डोक्याची शंभर शकले होणार, हे स्पष्ट होते, तरीही!
काही सोसायट्यांच्या सेक्रेटरींना उठवलं. अमूक अमूक नावाची, रत्नागिरीहून आलेली कुणी मुलगी तुमच्या सोसायटीत राहते का, असंही विचारलं. बरं, तिच्या नवऱ्याचं नाव-आडनाव, हुद्दा, नोकरी-व्यवसाय, आम्हाला काहीच माहित नव्हतं. फक्त माहिती होतं तिचं माहेरचं नाव आणि वर्णन.
कर्वेनगराच्या त्या स्मशानशांततेत हे "गढे मुर्दे' उकरण्यात किती तास गेले कुणास ठाऊक! सुमारे साडेबारा-एकच्या दरम्यान आम्ही ही मोहीम थांबवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं, की आम्ही भर अंधारात केलेली ही वणवण फारशी कुणाच्या उपयोगाची नव्हती. आमची पत्ते शोधण्याची खुमखुमी जिरली होती, एवढंच. लेख वेळेवर मिळाले नाहीत म्हणून, किंवा आमची वणवण वाया गेली म्हणून, कुणालाच सोयरसुतक नव्हतं! नंतर ती मैत्रीणही भेटली आणि ते लेखही. मात्र कायम स्मरणात राहील, असा एक उपद्व्याप आमच्या नावावर नोंदला गेला!
Jan 11, 2009
तात्या
दुसरं आवडतं काम म्हणजे अंगण करणं। आमच्या घराला छान अंगण होतं. एक छोटं, एक मोठं. मागे विहीरीच्या बाजूलाही एक अंगण. तिन्ही अंगणं साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीत केली जायची. आधी अंगण खणून घ्यायचं, मग ढेकळं फोडायची. दगड काढून टाकायचे. लागल्यास नुसती माती ओतायची. मग त्यावर पाणी मारून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी चोपणीनं (अंगण चोपण्यासाठीचं उपकरण) ते चोपून काढायचं. पुन्हा तसंच ठेवून त्यावर पाणी मारायचं. तिसऱ्या, चौथ्या दिवशी पुन्हा पाणी मारून व्यवस्थित चोप द्यायचे. मग सगळं सपाट झालं, की त्यावर सारवण घालायचं. आजोबांची ही अगदी आवडती कामं. आमचं अवसान गळायचं, पण आजोबा शेवटपर्यंत लढायचे.
कपडे धुणं, फुलं, पूजा, अंगणातला आणि घरातला केर, ही सुद्धा त्यांनी स्वतः मागून घेतलेली त्यांच्या आवडीची कामं। माडांना पाणी घालणं सुद्धा मनाजोगतं काम. वयाच्या ऐंशी-ब्याऐंशीव्या वर्षी स्वतःचे कपडे, चादरी, सतरंज्या आपटून, विहिरीवरून पाणी आणून धुताना मी त्यांना पाहिलंय.
व्यवसायानं ते हवालदार होते। त्याचे किस्सेही कधीकधी आम्हाला रंगवून सांगायचे.आजोबांच्या कष्टांची, अंगातल्या ताकदीची आणि इच्छाशक्तीची कमाल मी अनेकदा पाहिली आहे. संगमेश्वरला त्यांच्या मामांच्या गावी आम्ही अनेकदा जायचो. तिथे एकदा कुठल्यातरी नारायणमामाला भेटायला जायचं होतं. त्यांचं घर पार लांब, डोंगरावर होतं. हे तयार झाले. सोबत मी! सगळी घाटी चढून जाताना माझी फासफूस झाली, पण आजोबा थांबायला तयार नव्हते. तिथे जाऊन, जेवण करून संध्याकाळी पुन्हा मुक्कामी हजर!
संगमेश्वरजवळ असुर्डे या गावात रामनवमीला सगळी मुळ्ये कंपनी जमायची। दिवसभर कार्यक्रम झाले, की मग रात्री पत्त्यांचा "यज्ञ' चालायचा. सहा जणांमध्ये "लॅडीज'चा डाव रंगायचा. एकदा बसले, की आजोबांना कुणी उठू देत नसे. लॅडीज खेळण्यात आजोबा पटाईत. त्यांना तेवढा एकच डाव आवडायचा. नाहीतर पाच-तीन दोन. आम्ही लहानपणी त्यांच्याबरोबर ते खेळायचो. लॅडीज रंगलं, की रात्री दोन कधी वाजायचे, कुणाला कळायचंही नाही. मी आपला लिंबू-टिंबू असल्यानं, मला पानं टाकायची किंवा नुसतंच बघायची कामं मिळायची. एकदा हातात हुकमी पत्ते आले, की आजोबांचा चेहरा असा खुलायचा आणि बोटं अशी फिरायची, की विचारता सोय नाही! विशेषतः प्रतिस्पर्ध्याचा होणारा हात स्वतःच्या हुकमाच्या पत्त्यानं कापताना, किंवा एक्क्याची उतारी करतानाचा त्यांचा अभिनिवेश पाहण्यासारखाच!
पण रावसाहेबांसारखंच आजोबांचं तोंड म्हणजे अगदी "गटार'! शिव्यांचं गोदामच। त्यांची भाषा असंस्कृत नव्हती, पण रागावल्यानंतर, किंवा दुसऱ्याची अब्रू काढताना तिला "भ'हर यायचा. एखाद्याची मुक्त कंठानं प्रशंसा, स्वयंपाकाची तारीफ वगैरे त्यांना कधी माहीतच नव्हती. एकतर लहानपणापासून तुपाशी खायची सवय. त्यातून आजीही सुगरण मिळालेली. त्यामुळं जरा कुठे एखादा पदार्थ बिघडलेला त्यांना अजिबात चालायचा नाही.एकदा संक्रांतीला माझ्या आईच्या आईनं- आजीनं घरी गूळपोळ्या केल्या होत्या. जराशा करपल्या होत्या.
""अगो, काय राखुंडी केलेय की काय ही पोळ्यांची!'' आजोबांनी लगेचच शेरा मारून वासलात लावून टाकली।
मी म्हणालो, ""असू दे। उद्या सकाळी दात घासायला होईल!''
गोड, पक्वान्न वगैरे खाण्याचा त्यांना भलताच शौक। सणाचा दिवस म्हणजे दुपारी भरपूर जेवण, त्यानंतर झोप आणि संध्याकाळी चहाला सुट्टी! रात्रीसुद्धा थोडंसं ताक किंवा लंघन! एकदा नातीच्या लग्नात भरपूर श्रीखंड खाल्लं आणि मग महिनाभर खोकत होते! रात्री झोपताही येत नव्हतं!!
आजोबा कितीही रागीट असले, तरी आम्हाला त्यांची कधीच भीतीबिती वाटली नाही। एकतर माझ्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. माझ्यावर ते एकदाच रागावलेले आठवताहेत - खिडकीवर खेळताना उलटा आजीच्या पायावर पडलो होतो, तेव्हा. आजीच्या पायाचं मोठं खर्चिक प्रकरण झालं ते.
अमितला मात्र अनेकदा त्यांचा "प्रसाद' खावा लागायचा। एकदा तर रागाच्या भरात त्यांनी त्याच्या डोक्यातच लाकूड घातलं होतं. तो आंघोळीला लवकर येत नव्हता, म्हणून. डोक्यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं आणि डॉक्टरांकडे धावावं लागलं.माझा पहिला लेख छापून आला आणि पहिली मुलगी मला सांगून आली, तेव्हा आजोबा नाचायचेच बाकी राहिले होते. बीए झालेली, सुस्वरूप आणि रूढ अर्थानं "सुयोग्य' मुलगी मला सांगून आली आणि तिला मी नाकारलं, तेव्हा तर त्यांनी माझ्याशी अबोलाच धरला होता...
सहस्रचंद्रदर्शनानंतरही आजोबा स्वतःची कामे स्वतःच करत होते। त्यांना अंथरूणावर झोपून राहिलेलं आम्ही कधीच पाहिलं नाही. पायाला सायटिका झाला आणि ते खचले. दोन-तीन महिने त्यांना चालताच येत नव्हतं. त्यातून त्यांच्या मनानं जी हाय खाल्ली, ती खाल्लीच! नंतर त्यांना अचानक कावीळ झाली. ती पोटापर्यंत पसरल्यानंतरच लक्षात आली. मी पुण्यात होतो आणि आजोबांना ऍडमिट केल्याचं कळलं. रत्नागिरीला जाण्याचा विचार करत होतो, पण एवढी इमर्जन्सी नाही, असं कळलं होतं. एके दिवशी सकाळी अचानक कळलं, आजोबांना घरी आणलंय. "घरी आणलंय' म्हणजे, आता डॉक्टरांचे उपचार थांबलेत आणि आता पुढे काही होऊ शकणार नाही. काही तासांतच ते गेल्याची बातमी कळली. मला त्यानंतर रत्नागिरीला जाणंही शक्य नव्हतं. तोपर्यंत अंत्ययात्रा थांबणार नव्हती. मला आजोबांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. खूप रडलो त्या दिवशी खोलीवर. पण रडूही येत नव्हतं.
आजोबांची शेवटची भेटही न होणं, हा कदाचित लहानपणापासून मिळालेल्या त्यांच्या प्रेमाबद्दलचा काव्यात्म न्याय असावा!
Jan 8, 2009
माझा बाप, डोक्याला ताप!

कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना! अर्थात, अजूनही सोडत नाही, पण माझ्या जन्मापासून आणि मला सांभाळण्याची जबाबदारी उरावर पडल्यापासून जरासा आटोक्यात आला बिचारा. लगामच बसला म्हणा ना, आमच्या उधळलेल्या घोड्याला! मला कळायला लागल्यापासून मग मलाच सिनेमाला घेऊन जायला लागला.
मी थेटरात जाऊन पाहिलेला पहिला सिनेमा `जबरदस्त.' म्हणजे, तसं नाव होतं सिनेमाचं . सिनेमा जबरदस्त नव्हता. आई-बाबा दोघंही बरोबर होते. बर्यापैकी गप्प राहिले होते मी. मी आणि बाबा, दोघांनी एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे माझ्या आवडत्या शाहरुख खानचा `चक दे इंडिया'. बरा होता. स्टोरी बिरी कळायचं माझं वय नव्हतं. अवघी अडीच वर्षांची असेन मी तेव्हा. पण आमच्या परमपूज्य पिताश्रींची हौस! राहवेना त्यांना. मग मी सुद्धा ३ तास गप्प बसण्यासाठी आइस्क्रीम नि आणखी काय काय च्याऊ माऊ पदरात पाडून घेतलं.
मग बाप सोकावलाच आमचा! मी राहतेय म्हटल्यावर मला घेऊन कुठेही, कधीही सिनेमाला जायला लागला. अर्थात, त्याचाही नाइलाजच होता म्हणा! परीक्षण हे त्याचं कामच ना! मग अलका, लक्ष्मीनारायण, विजय, प्रभात, नीलायम, सिटीप्राईड, कुठे कुठे दौरे केले आम्ही. तसे, फक्त माझ्या आवडीसाठी फारच कमी सिनेमे बघितले आम्ही. अगदी रिटर्न ऑफ हनुमान, वगैरे. एक नाटकही दाखवलं त्यानं मला. पण मला काहीच झेपेना. गलगले निघाले, चल गंमत करू, पटलं तर घ्या, कसले कसले सिनेमे दाखवले आमच्या जन्मदात्यानं मला! एक तर भीषणच होता! सुखी संसाराची सूत्रे का काय तरी! बापही वैतागला होता या छळाला. मग माझी काय अवस्था झाली असेल बघा!
`रिटर्न ऑफ हनुमान' फार हिंसक होता. मला तोही नाही आवडला. शिवाय मला कधी नव्हे ते कोल्ड्रिंक पाजायची दुर्बुद्धी झाली आणि उलटीच झाली मला. सगळा फियास्को! मग आलो घरी. दे धक्का, उलाढाल मध्येही फार रमले नाही. `उलाढाल'च्या वेळी सिद्धार्थ जाधवला भेटले आणि मकरंद अनासपुरेला पाहिलं, तेवढाच आनंद! नाही म्हणायला `सही रे सही'च्या वेळी बापानं भरत जाधवशीही भेट घालून दिली आणि एकदा सुबोध भावेच्या घरी त्याच्याशीही!! आता शाहरूखला भेटवण्याची गळ घातलेय मी त्याला!
परवा तर गम्मतच झाली. शाहरुख खानचा पिक्चर बघायचा, मकरंद अनासपुरेचा की हत्ती नि अक्षयकुमारचा, असं बाबानं विचारलं. त्याला पक्की खात्री होती, मी शाहरुख खानचं नाव घेइन. कारण त्यालाही तोच (रब ने बना दी जोडी) बघायचा होता. पण मी त्याचा पोपट केला. हत्तीच्या पिक्चरची (जंबो) निवड करून त्याला पार उलटाच पाडला! मग नाइलाजानं त्यानं `जंबो'ला नेलं. मजा आली, पण त्यातलं युद्ध आणि जंबोची नि त्याच्या आईची ताटातूट नाही आवडली मला. रडलेच मी! नक्की कसा पिक्चर आवडतो हिला?' अशा प्रश्नांचं जंजाळ पाहिलं मी बाबाच्या चेहर्यावर.
माझी आवड नक्की आहे तरी कशी, यावर बाबाची पीएचडी सुरू होती. वाढदिवसापासून मला खोकला झाला. सध्या त्याचा यशस्वी तिसरा आठवडा सुरू आहे. (बाबाचा आवडता पिक्चरही एवढे आठवडे टिकत नाही!) माझ्या परमप्रिय आईनंच मग माझं नाचणं, पळणं बंद करून देण्यासाठी कुठला तरी माकडाचा पिक्चर लावून देण्याचं फर्मान सोडलं. बापाला काय्...गुनान ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. लावला बिचार्यानं! मला तो प्रचंडच आवडला. एकदा, दोनदा, तीनदा, सात-आठ वेळा बघून झाला आत्तापर्यंत. एवढा आवडला, की आता सीडी लपवून ठेवायचा विचार करतायंत आई-बाबा!
तर, त्या महान सिनेमाचं नाव म्हणे `डंस्टन चेक्स इन'! असो. नावात काय आहे? तरीही, पहिल्यांदा बघून झाल्यावर `बाबा, मला नाही आवडला पिक्चर. यात सगळीकडे नाहीये माकड!' अशी लटकी तक्रार केलीच मी. पण मनातून आवडला होता. अजूनही आवडतोय. आता तरी बाप वेगवेगळे प्रयोग करून माझा छळ मांडणार नाही, अशी आशा!
- मनस्वी (आपला) अभिजित.
Jan 5, 2009
देव पावला!
एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही। दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो। नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं। पण पुढे ढकलत होतो. आधीचं घड्याळ आजीनं घेऊन दिलेलं, साधारणपणे आठ-नऊ वर्षे जुनं असावं. चारशे-साडेचारशे रुपयांचं. आता "लय भारी' घड्याळ घ्यायचं ठरवलं. हे मात्र स्वतःच्याच हौसेपायी. (हो...दरवेळी बायकोच्या नावानं कशाला बिल फाडायचं?) "टायमेक्स'च्या शो-रूम मध्ये गेलो, तर ती रेंज काही आपल्याला बापजन्मात परवडण्याजोगी नव्हती. मग शेजारीच "टायटन'च्या दुकानात भीत-भीत शिरलो. हजार-बाराशेपर्यंतच्या खरेदीची मानसिक (आणि आर्थिकही) तयारी केली होती. (असल्या भल्यामोठ्या, आलिशान शोरूम किंवा मॉलमध्ये वगैरे (अर्थातच, नुसतं विंडो-शॉपिंग करायला!) गेलं, की मला उगाचच आपल्यावर कुणी वॉच-बिच ठेवून आहे की काय, अशी शंका येते. आपण जणू कुणी चोर-दरोडेखोर असल्यासारखेच ते सेल्समन-वूमन-गर्ल्स आपल्याकडे बघत असतात. मला तर "पुष्पक'मधल्या कमल हासनच्या त्या प्रसंगाचीच आठवण येते. असो.) "सोनाटा'ची घड्याळं काही आकर्षक नव्हती. मग मनाचा हिय्या करून "टायटन'च्या रेंजकडे नजर वळवली. 1400 रुपयांचं एक घड्याळ आवडलं. घ्यायला बायकोनंही भरीला घातलं. म्हटलं हाय काय नि नाय काय! घेऊन टाकलं!
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचा उद्देश हा, की गेले काही दिवस या घड्याळाचा पट्टा सैल झाला होता। आणि एकदा शंका आली होती, तोच अनर्थ रविवारी रात्री घडला. सोमवारी सकाळी घराबाहेर पडताना शोधू लागलो, तर घड्याळ जागेवर नव्हतं. जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जिथे असू शकतं, तिथेही नव्हतं. मग मी रात्री साडेदहाला औषधं आणायला बाहेर पडलो होतो, ते आठवलं. रात्री कुठे वाटेत पडलं असेल, तरी सकाळनंतर ते मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. बरं, मी संध्याकाळी एकदा आणि रात्री एकदा असं दोनदा बाहेर पडलो होतो. नेमकं कोणत्या वेळी घड्याळ हातात होतं आणि कोणत्या वेळी नव्हतं, काहीच आठवेना.
एकतर मी माझं दोन रुपयांचं पेनसुद्धा हरवलं, तरी अस्वस्थ होतो। अर्थात, त्यापायी मला अन्नपाणी गोड न लागणं बापजन्मात शक्य नाही! परीक्षेत एका ओळीचाही अभ्यास झालेला नसताना, बारावी-एसवायला नापास झालो तेव्हा, घरातून "पळून' गेल्यावर, शेअर मार्केटमध्ये शेण खाल्ल्यावर...सगळ्या प्रसंगांत मला अन्न-पाणी व्यवस्थित गोडबिड लागत होतं. पण माझी झोप मात्र उडते काही हरवल्यानंतर. हल्ली जरा कोडगेपणा वाढला आहे, तरी अस्वस्थता आलीच. वाटेनं उलटं जाऊन शोधण्यातही काही अर्थ नव्हता. शक्यता दोनच होत्या- सोसायटीत पडलं असल्यास वॉचमनला मिळालं असलं तर आणि दुसरी, पण अगदीच धूसर शक्यता म्हणजे त्या मेडिकल दुकानातच ते पडलं असलं आणि दुकानदारालाच मिळालं असलं, तर! वॉचमनला अपेक्षेप्रमाणे पत्ताच नव्हता. मग मेडिकलकडे मोर्चा वळविला. शेवटची आशा म्हणून! अपेक्षा नव्हतीच, त्यामुळे जाताना वाटेत स्वतःवर विनोदही केले. लहानपणी (माझ्या!) आजी गजानन महाराजांची पोथी वाचायची आणि मलाही वाचायला लावायची. त्यासोबत, गजानन महाराज कुण्या भक्ताची बॅगबिग वेगळ्या रूपात जाऊन परत करतात वगैरे (भाकड)कथाही सांगायची. पण मी नास्तिक असल्यामुळं, गजानन महाराजांचा कुणी अवतार माझं घड्याळ घेऊन "याचा मालक कोण आहे,'वगैरे शोधत बसला असेल, अशी सुतराम शक्यता नव्हती!
दुकानात पोचलो आणि चौकशी केल्यावर काय आश्चर्य! त्या सद्गुणाच्या पुतळ्यानं दोन मिनिटांत टेबलावरच ठेवलेलं माझं घड्याळ मला परत केलं। त्यात माझ्या भावना बिवना नव्हे, तर माझे पैसे गुंतलेले होते. त्यामुळे जिव्हाळा जास्त होता. मला तर त्या दुकानमालकाच्या जागी भगवान विष्णूच विश्वरूपदर्शन देताहेत आणि मी नतमस्तक झालो आहे, असं चित्र दिसू लागलं होतं! "चौदाशे रुपयांच्या घड्याळासाठी एक हजार रुपये काढा!' या त्याच्या प्रेमळ टिप्पणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, केवळ औपचारिक धन्यवादाचा पुणेरी+कोकणी बाणा दाखवून मी काढता पाय घेतला. पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं ("बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार.
असो. "आठवं आश्चर्य' एवढाच एसएमएस ऑफिसमध्ये पोचल्यावर बायकोला केला. आणि तिला तो चक्क कळला!

