Sep 11, 2008

मेगा`ब्लॉग'

न्यू यॉर्कहून परतीच्या प्रवासात बच्चनसाहेब अस्वस्थ होते. विमानाच्या कॉरिडॉरमध्ये येरझारा चालू होता। सारखा ते कुणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होते (बहुधा अमरसिंहांना असावा), पण लागत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत होती.
``सर, मे आय हेल्प यू? वुड यू लाइक टु हॅव सम कॉफी ऑर ड्रिंक?'' एक हवाईसुंदरी मार्दवी सुरात म्हणाली। मुळात बच्चनसाहेबांशी आपल्याला बोलायला मिळालं, याचंच तिला कौतुक
""नो, थॅंक्‍स।'' बच्चनसाहेबांनी शक्‍य तेवढ्या सौजन्यानं तिला उडवून लावलं।

बच्चनसाहेबांचं सामान वगैरे पुन्हा गायब झालं की काय, असं त्या हवाईसुंदरीला वाटलं। आता आपल्या एअरलाइन्सचं आणि नोकरीचं काही खरं नाही, अशी भावना तिच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांच्या मनात दाटून आली. मात्र या वेळी पुरेशी खबरदारी घेतली असल्याचं अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कळवल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.
बच्चनसाहेबांनी "नवरत्न तेल' चोळून पाहिलं, पण त्याचाही उपयोग झाला नाही। चित्रपटसृष्टीतल्या चाळीस वर्षांच्या प्रवासातील चढउतार ज्या तेलाच्या भरवशावर त्यांनी पार केले, त्यानं या वेळीही साथ देऊ नये, याचा त्यांना मनस्वी राग आला. पण तरीही "इमेज'ला ते मारक असल्यानं ते गप्प राहिले. खरं तर "एबीसीएल' गाळात गेली तेव्हा, रेखा प्रकरण सर्वाधिक चर्चेत होतं तेव्हा, बंगल्यावर जप्ती आली तेव्हाही एवढी अस्वस्थता बच्चनसाहेबांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे या वेळचं नेमकं कारण काय असावं, याचं सर्वांना कुतूहल आणि कोडंही होतं. अखेर एकदाचं विमान मुंबई विमानतळावर उतरलं. बच्चनसाहेबांचा मोबाईल सुरू झाला, "न्यूज अलर्ट'ही मिळाले.
अचानक "युरेका युरेका!' थाटात ते ओरडले, ""अरे मिल गया, मिल गया!''
कुणीतरी सहकारी सोबत होता।
"क्‍या मिल गया साब?''
""अरे भैया, ब्लॉग के लिये नया विषय मिल गया!''
""साब, मराठी में बोलो, हम मुंबई में हैं।'' सहकाऱ्यानं जाणीव दिली।
``अरे हां!'' बच्चनसाहेब म्हणाले, ""मिळाला, मिळाला, ब्लॉगसाठी विषय मिळाला।''
तेव्हा कुठं सर्वांच्या लक्षात आलं, की "अनफर्गेटेबल टूर'मधल्या बऱ्याचशा विस्मरणीय अनुभवांवर लिहिल्यानंतर आता ब्लॉगवर काय लिहायचं, हा यक्षप्रश्‍न त्यांना पडला होता. मुंबईत "रेंज' मिळाल्यानंतर जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून उडालेला गदारोळ त्यांना समजला। त्यांनी तातडीनं विषय मिळाल्याचं जया बच्चनना कळवलं आणि त्याचबरोबर वादाबाबत माफी मागण्याचा सल्लाही त्यांना दिला. घराच्या परतीच्या वाटेवर लॅपटॉप उघडून स्वतःच्या ब्लॉगवरही माफीनामा लिहून टाकला.
ता. क. :"डॅड'च्या ब्लॉगसाठी नवा विषय देण्यासाठी आता अभिषेकनं ऐश्‍वर्याकडे आग्रह धरलाय म्हणे!

Sep 9, 2008

गणपती बाप्पा मोरया!

गणपती म्हंजे कोकणी मान्साचो वीक प्वाइंट। गणपतीला घरी न जायील, तो कोकनी म्हनायचाच

सांगूक काय होता, की दरवर्सारमानं कोकनात गेल्तो।

औंदा सगळ्या दिवसांसाठी नाय, तर फकस्त चारच दिवसांसाठी. पण मजा आली.एकतर पहिल्या दिवशी येणार नाही, म्हणून आई भडकली होती. पण चार दिवस गेलो, हेही नव्हते थोडके।


रत्नागिरीत पोचलो तेव्हा गणपती घरी येऊन दोन दिवस झाले होते. पण "घरचा गणपती' आला नसल्याने पंचपक्वान्नांचा नैवेद्य बाकी होता. पहिल्याच दिवशी आईनं मोदकांचा घाट घातला. मीही थोडे हात साफ केले, पण काही जमलं नाही. मनस्वीही लुडबुड करायला बसली होती. संध्याकाळी गावातले दोनचार गणपती बघून आलो. फादरांच्या गाडीला सध्या ड्रायव्हर नसल्यानं मी गेलो की मीच ड्रायव्हर. मग काय, इकडे जाऊ नि तिकडे जाऊ. लालबागच्या राजासारखा यंदा तिकडे "रत्नागिरीचा राजा' हा मोठा गणपती बसवला आहे. तो पाहिला. संध्याकाळी आरती बिरती आणि मग गुडूप!

दुसऱ्या दिवशी गणपतीपुळ्याला जायचा घाट घातला होता. घरी कुणीतही हवं म्हणून आई घरी थांबली आणि आम्ही फादरांसह तिकडे गेलो. प्रवास धमाल होता. गणपतीपुळे आमच्या घरापासून आता अगदी 26 किलोमीटरवर आलंय. त्यातून रस्ताही मस्त आणि निसर्गरम्य! जातानाचा आरे-वारे पूल तर सुंदरच! ("फुल 3 धमाल' या चित्रपटात तुम्ही कदाचित पाहिला असेल.) पाऊण तासात गणपतीपुळ्याला पोचलो. दर्शन घेऊन किनाऱ्यावर उधळलो. मनस्वीला भरपूर खेळायचं होतं, पण आम्हाला जेवायला घरी यायचं होतं. मग तिथलं कोकण दर्शन प्रदर्शन न पाहताच माघारी फिरलो. येताना थोडासा रस्ता चुकलो, पण त्यामुळं दोन किलोमीटर वाचले. एकूण सहल झकास झाली.नंतरचे दोन दिवसही घरगुती व सार्वजनिक गणपती पाहणे, फिरणे, यात गेले।

विसर्जनाला यंदा मी पहिल्यांदाच गणपती घेतला होता. शेजारच्या तळ्यात मी स्वतःच विसर्जन केलं. वडिलांची गादी आता मुलाकडे आली म्हणायची! अप्पांनी तर पुढच्या वर्षी माझ्यावर जबाबदारी टाकण्याची घोषणा करून हात झटकून टाकले!संध्याकाळी काळ्या समुद्रावर (रत्नागिरीत काळी वाळू आणि पांढरी वाळू असलेले दोन समुद्रकिनारे आहेत. त्यांना काळा समुद्र आणि पांढरा समुद्र म्हणतात.) विसर्जन पाहायला गेलो. तिथेही मजा आली. आम्हाला रात्रीच्या गाडीसाठी लवकर परतायचं होतं. त्यामुळं फार वेळ आनंद नाही घेता आला.प्रवास ठीक झाला, पण रात्रभर पाऊस होता. सकाळी रिक्षा मिळवतानाही बोंब झाली. कसेबसे पहाटे साडेपाचला घरी पोचलो।

एकत्र आरत्या वगैरे म्हणण्याची परंपरा हल्ली लुप्तच झाली आहे. लहानपणी आम्ही घरोघरी जाऊन आरत्या म्हणायचो. पूर्वी मिऱ्या भागात अनेकांकडे घरगुती गणपती आणि देखावे पाहण्यासारखे असायचे. हल्ली तेही नाही. थोडेफार उरलेत, त्यांचाही उत्साह मावळला आहे. ब्राह्मणेतर लोकांमध्ये गणपतीचा उत्साह आणि एकोपा अजून दिसतो. बामण मात्र त्याबाबत चिकू मारवाडी आणि हातचं राखून वागणारे!असो. आता यंदाही पुण्यातले देखावे बघायला फारसा वेळ मिळेलसा वाटत नाही.

ता. क. गेल्या वर्षीच्या गणपतीच्या पोस्टसाठी इथे पाहा....
http://abhipendharkar.blogspot.com/search/label/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87

आणि फोटो इथे...
http://picasaweb।google।com/abhi.pendharkar/ycmnb

कथा कढईभर शिऱ्याची!

खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता। उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली.

तेव्हा रत्नागिरीत राहत होतो। दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं। वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं. (क्रिकेटच्या मॅच आणि नातेवाइकांची लग्नं परीक्षेच्या काळातच का घेतात, हा बालमनाला पडलेला प्रश्‍न अजूनही सुटला नाही!) घरच्यांचा आग्रह होता, मीही यावं असा; पण दहावीच्या अभ्यासाचा `कोंडाणा' सर करण्याच्या जिद्दीपुढे मला आत्तेबहिणीच्या लग्नातल्या आनंदाची फिकीर नव्हती.

तीन-चार दिवस आई-बाबा पुण्याला जाणार होते. घरात आमचं एकट्याचंच राज्य होतं. दूध बरंच शिल्लक होतं, म्हणून त्याचं दही लावलं. तेही शिल्लक राहिलं, तेव्हा काय करायचं, असा प्रश्‍न पडला नाही. सुपीक डोक्‍यात श्रीखंडाची कल्पना शिजली. (धोतराच्या फाडलेल्या) मऊसूत फडक्‍यात रीतसर दही टांगून ठेवून चक्का वगैरे केला. दीड-एक दिवसानं घट्ट चक्का झाला. मग त्यात साखरबिखर घालून, घाटून श्रीखंड केलं. तशी पोळी-भाजी रोज करत होतोच; पण श्रीखंड पोळीबरोबर कसं खायचं? म्हणून पुऱ्या लाटून तळल्या. फर्मास बेत झाला. घरी एकट्यानं मांड ठोकून त्यावर ताव मारला. कुणी वाटेकरी नको, की कुणाची अडचण नको.
दुसऱ्या दिवशी शिऱ्याचा बेत आखला होता। माझा पहिलाच स्वतंत्र प्रयोग होता। तशी रेसिपी माहीत होती; पण प्रत्यक्ष कधी प्रयोग केला नव्हता. साधारण जेवढी कढई भरून शिरा हवा, तेवढाच रवा, या हिशेबानं पाच सहा मुठी रवा घेतला. सुमारे तासभर लागला असेल, शिरा व्हायला. एवढं करून तो गोळाच्या गोळा. दोन दिवस फक्त शिराच खात होतो!चौथ्या दिवशी आई पुण्याहून आली आणि सगळी आवराआवर करताना उरलेला अर्धी कढई शिरा तिला फ्रीजमध्ये दिसला. त्यानंतर काय रामायण झालं असेल, याचा अंदाज कुणालाही येऊ शकेल.

"अभ्यास करायचा म्हणून लग्नाला आला नाहीस आणि तुझे हे धंदे?''

...जणू काही मी घरच विकून खाल्लं होतं! पण ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता।

त्या दिवशी मला भूक नसतानाही एका जागी मांडी ठोकून तो शिरा तिनं (प्रेमानं) खायला घातला..

...पुढचं वर्षभर मी शिऱ्याचं नाव काढलं नाही!

Sep 1, 2008

नकटीच्या लग्नाला...

बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं। वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते। आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती.नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं. नकटीच्या लग्नाचा एकदा बार उडवू, मगच समाजकार्य करू, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. पण कुठेतरी माशी शिंकत होती।

तसं एकदा वधूपित्यानं मनाचा हिय्या करून नकटीचं लग्न ठरवलंही होतं. स्वयंवरच मांडलं होतं म्हणा ना! तिला नटवून, सजवून मंडपात आणलं होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती. इच्छुक असलेले सगळे राजे-महाराजे, अथिरथी-महारथी जमले होते. सगळीकडे आनंदीआनंद होता. आता नकटीचं लग्न होणारच, असंच वातावरण होतं. मात्र पुन्हा कुलस्वामिनीनं डावा कौल दिला. झालं! सगळी मेहनत पाण्यात गेली. बरं, कुलस्वामिनीवर वधूपित्याची भक्ती अफाट. तिच्याशिवाय तर झाडाचं पानही हलायचं नाही. ती लांबच्या वारी असली, तरी विमानवारी करून तिच्या पायी लोटांगण घालण्याशिवाय कुणाला पर्यायही नव्हता.मध्यंतरी बरेच दिवस गेले।

नकटीचं लग्न हा आता नातेवाइकांच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आणि काही चहाटळ पत्रकारांच्याही चेष्टेचा विषय झाला होता. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी नकटीची आणि त्यातून वधूपित्याची अवस्था झाली होती. बरं, आधीच त्याच्या घरातल्या, घराबाहेरच्या अनेक समस्यांनी तो मेटाकुटीला आला होता. बाहेरून घरात येऊन त्याच्याच डोक्‍यावर ठाण मांडून बसलेल्या सोयऱ्यांनी उभा दावा मांडला होता. नकटीला आम्ही सांभाळू, असं जाहीर करून, वधूपित्याची लायकीही त्यांनी चव्हाट्यावर मांडली होती. अधूनमधून त्यांचंही कुलस्वामिनीला कौल लावणं चालूच होतं. पण कुलस्वामिनी भक्तांची परीक्षाच पाहत होती जणू. कुणालाच नीट कौल देत नव्हती

....आणि एके दिवशी चमत्कार झाला! त्या बाहेरून आलेल्या परक्‍यांनी वधूपित्याची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर मांडली आणि कुलस्वामिनीकडे धाव घेतली. आता वधूपित्याच्या हातून सर्व अधिकार जाणार आणि नकटीची जबाबदारी उपऱ्यांकडे जाणार, असंच निष्ठावंतांना वाटायला लागलं. पण झालं भलतंच. एवढे दिवस न पावलेली कुलस्वामिनी वधूपित्यावर अचानक प्रसन्न झाली. त्याच्या बाकीच्या मागण्या तर तिनं मान्य केल्याच, वर उपऱ्यांना गप्प बसण्यास सांगून त्याच्या पदरात आणखी दान टाकलं. आंधळा मागतो एक डोळा अन्‌ देव देतो दोन म्हणतात, ते खोटं नाही. कुलस्वामिनीनं नकटीच्या लग्नालाही कौल दिला, तेव्हा तर वधूपित्याला आभाळ ठेंगणं झालं.मंडप पुन्हा सजला. सनई-चौघडे वाजू लागले. घराला रंगरंगोटी झाली. वधूपिता कधी नव्हे एवढा तजेलदार दिसत होता. नकटीच्या लग्नाचा मुहूर्त एकदाचा ठरला...बारामतीच्या व्याह्यांबरोबर बोलणीही झाली. पुढं पुढं करणाऱ्यांचे कानही सोनारानंच टोचले, ते बरं झालं. आता पुढच्या आठवड्याच्या मुहूर्ताकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत

...लग्नाला यायचं हं!
---------------
टीप ः या लेखातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक आहेत। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार यांच्याशी त्यांचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----

Aug 30, 2008

रामूची "आग' अन् प्रेक्षकांची होरपळ!

चित्रपटगृहात जाऊन 'फूंक' एकट्यानं बघणाऱ्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस रामगोपाल वर्मानं ठेवलं होतं. कुणी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा दावा केला, तर कुणी अर्ध्यावरच मैदान सोडून पळून गेलं म्हणे. 'फूंक'च्या जाहिरातीसाठीचा हा स्टंट होता, अशीही चर्चा झाली.
रामू हा तसा डोकेबाज आणि ताकदीचा दिग्दर्शक. तसाच तऱ्हेवाईकही. त्याच्या चित्रपटातली पात्रं विक्षिप्त वागतात (आठवा ः 'रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी! ), त्यावरून तो रामूच्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असावा की काय, असं वाटतं. लेखक नाही का, स्वतःच्याच कुटुंबात, आसपास पाहिलेली पात्रं आपल्या कलाकृतीत साकारतात. तसंच दिग्दर्शकांनाही आपल्या स्वभावावर, आयुष्यावर चित्रपट काढण्याची खुमखुमी असते. त्यातून रामू तर जीवनातल्या अनुभवांवर आधारितच चित्रपट बनवतो. त्यामुळं तर त्याच्याविषयीची शंका आणखी बळावते. त्यातून 'रात', 'भूत', 'वास्तुशास्त्र', 'डरना मना है', 'डरना जरूरी है' आणि आता 'फूंक' असे चित्रपट काढून आणि त्यातले काही दिग्दर्शित करून त्यानं आपला विक्षिप्तपणा सिद्धही केला आहे.
'फूंक' एकट्याने पाहा आणि पाच लाख रुपये मिळवा, हा जाहिरातीसाठीचा स्टंट होता, की आणखी काही, हे रामूच जाणे. आमच्या निरागस मनातला प्रश्न एवढाच आहे, की ही स्पर्धा 'फूंक'बाबतच का? आधीच्या भयपटांबाबत ती का नाही घेतली? खरं तर 'कौन' रहस्यपट असला, तरी रामूचा सर्वोत्तम भयपटच होता. आणि त्याहूनही मोठा आक्षेपाचा मुद्दा असा, की रामूनं आधीच्या 'दौड', 'गो', 'रोड', 'मिस्टर या मिस', 'नाच' या चित्रपटांबाबत ही स्पर्धा का नाही ठेवली? कारण हे चित्रपटदेखील आम्ही चित्रपटगृहात सलग पाहू शकलो नव्हतोच! एरवी, वीस-पंचवीस प्रेक्षकांसोबत ते पाहणं हा भयावह अनुभव होता. तर एकटे कसे काय पाहणार?
'रामगोपाल वर्मा की आग' म्हणून रामूनं 'शोले'ची जी काही अब्रू काढली होती, ती आम्हाला विव्हळत, घायाळ होत, धापा टाकत पाहावी लागली. 'आग' बघून केस उपटून न घेतलेला, कपडे-बिपडे टरकावून रस्त्यावरून पिसाटासारखा पळत न गेलेला प्रेक्षक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी स्पर्धाही घेता आली असती. 'फूंक' वगैरे चित्रपट जसे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी त्यानं काढले, तसेच हे काही चित्रपट त्यांचा सूड घेण्यासाठी काढले, असं आमचं स्पष्ट मत आहे. असो. रामूनं सत्याला सामोरं जावं, एवढंच आमचं मागणं आहे. 'सत्याला' म्हणजे सत्य परिस्थितीला. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 'सत्या'ला नाही!